
Pune : डॉ. प्रदीप कुरुलकर यांच्या न्यायालयीन कोठडीत वाढ
पुणे - संरक्षण संशोधन आणि विकास संस्थेच्या पुण्यातील संशोधन आणि विकास आस्थापना (आर अँड डीई) या प्रयोगशाळेचे संचालक आणि वरिष्ठ शास्त्रज्ञ डॉ. प्रदीप कुरुलकर यांच्या न्यायालयीन कोठडीत पुन्हा एकदा वाढ करण्यात आली आहे. विशेष न्यायाधीश एस. आर. नावंदर यांच्या न्यायालयाने डॉ. कुरुलकर यांना १२ जूनपर्यंत न्यायालयीन कोठडी सुनावली आहे.
डॉ. कुरुलकर यांनी पाकिस्तानी गुप्तचर यंत्रणेला (पीआयओ) काही संवेदनशील माहिती तसेच छायाचित्रे पाठविल्याचा संशय आहे. त्यानुसार ही चौकशी सुरू असल्याची माहिती एटीएसच्या अधिकाऱ्यांनी दिली. डॉ. कुरुलकर यांना अटक करण्यात आल्यानंतर एटीएसकडून करण्यात आलेल्या तपासाबाबतचा अहवाल न्यायालयात सादर करण्यात आला आहे.
२०२२ मध्ये डॉ. कुरुलकर यांनी सहा देशांना भेटी दिल्या आहेत. तर २०१० ते २०२२ दरम्यान डॉ. कुरुलकर ५३ दिवस परदेशात होते. शासकीय पासपोर्टद्वारे ते परदेशात गेले होते. शासकीय पारपत्राचा वापर करून ते पाकिस्तानी हेरांना भेटल्याचा संशय एटीएसला आहे. परदेशात ते कोणाला भेटले, यादृष्टीने त्यांची चौकशी करण्यात येत आहे. तसेच त्यांची पोलिग्राफ टेस्ट देखील करण्यात येणार आहे.