Pune News : डॉ. राम ताकवलेंच्या कर्तृत्वाला उजाळा... pune dr ram takwale Highlight the achievements | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Sharad Pawar

Pune News : डॉ. राम ताकवलेंच्या कर्तृत्वाला उजाळा...

पुणे - वार्षिक परीक्षेला सत्र पद्धतीत आणणारे, गुणपत्रिकांची छपाई संगणकाद्वारे करणारे, बारदाणावर बसून मुक्त विद्यापीठासाठी पत्रे लिहिणारे, विद्यार्थ्यांसाठी प्रश्नसंचाची मांडणी करणारे आणि एमकेसीएलद्वारे राज्याच्या संगणक क्रांतीचे जनक ठरलेले समाज शिक्षक माजी कुलगुरू डॉ. राम ताकवले यांच्या कर्तृत्वाचे विविध पैलू सोमवारी उलगडले. बालगंधर्व रंगमंदिरात राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांच्या उपस्थितीत श्रद्धांजली सभेचे आयोजन करण्यात आले होते.

यावेळी आमदार दिलीप वळसे-पाटील, आमदार संजय जगताप, डॉ.एम.जी.ताकवले, स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठाचे माजी कुलगुरू डॉ. पंडित विद्यासागर, यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. सजीव सोनवणे, राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठाचे माजी कुलगुरू डॉ.एस.एम. पठाण, डॉ. एस.के.जैन, कुमार सप्तर्षी, डॉ. संजीव पलांडे, सुभाष वारे, डॉ. गजानन एकबोटे, डॉ. प्रभाकर ताकवले आदी उपस्थित होते.

शैक्षणिक क्षेत्रातील बदलांना विचारात घेऊन काम करणारे डॉ. राम ताकवले खऱ्या अर्थाने द्रष्टे कर्तृत्ववान होते, असे पवार यांनी सांगितले. ते म्हणाले, ‘‘ताकवले सरांचे विचार आणि संकल्पनेतूनच यशवंतराव चव्हाण मुक्त विद्यापीठाचा जन्म झाला. त्याद्वारे राज्यातील लोकांची शैक्षणिक पातळी वाढविण्याचे काम झाले. हे सर्व श्रेय डॉ. ताकवले यांचेच. त्यांच्या प्रयत्नांतून उभे झालेले महाराष्ट्र ज्ञान महामंडळाने केवळ राज्यात नाही. तर परदेशातही नाव कमविले आहे. त्यांच्या भूमिकेचे जतन आपण करायला हवे.’

नवीन शैक्षणिक धोरणाच्या संक्रमण काळात डॉ. ताकवले यांची खरी गरज होती, असे मत जवळपास सर्वच वक्त्यांनी व्यक्त केली. यावेळी वळसे पाटील म्हणाले, सर्वसामान्यांना संगणकाचे शिक्षण मिळावे म्हणून महाराष्ट्र ज्ञान महामंडळाची स्थापना हा ताकवले सरांचा विचार होता. ते पारंपारिक विचाराचे नव्हते तर दर वेळला ते नवीन काहीतरी सांगायचे. नव्या शैक्षणिक धोरणात आज सांगितलेल्या अनेक बदलांची बीजे डॉ. ताकवले यांनी कैक वर्षांपूर्वी रोवली. आज असलेल्या संभ्रमाच्या अवस्थेत ते हवे होते.’’ दूरशिक्षण देणाऱ्या यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठाला ऑनलाइन पदवी देणारे विद्यापीठ करेल, असा विश्वास नवनियुक्त कुलगुरू डॉ. संजीव सोनवणे यांनी व्यक्त केला.