
Pune : मत्स्यपालन प्रकल्पामुळे लाखो पुणेकरांच्या आरोग्याशी खेळ ? पानशेत धरणात...
सिंहगड - लाखो पुणेकरांसह पुण्याच्या पश्चिम भागातील खेड्यापाड्यातील नागरिकांची तहान भागविणाऱ्या पानशेत धरणाच्या पाण्यात मागील काही वर्षांपासून खाजगी मत्स्यपालन प्रकल्प सुरू आहे.
या मत्स्यपालन प्रकल्पामुळे पाण्याचे मोठ्या प्रमाणात प्रदुषण होत असून सध्या पाण्याची पातळी खालावल्याने प्रकल्पाजवळ दुर्गंधी येत आहे. याबाबत अनेक वेळा परिसरातील गावांतील नागरिकांनी तक्रारी केलेल्या आहेत मात्र प्रशासनाने गांभीर्याने दखल न घेतल्याने लाखो नागरिकांच्या आरोग्याचा प्रश्न निर्माण झाला आहे.
पानशेत धरणात मत्स्यव्यवसाय विकास विभागाच्या परवाणगीने मागील काही वर्षांपासून खाजगी मत्स्य पालन केंद्र सुरू आहे. दरवर्षी उन्हाळ्यात पाण्याची पातळी खाली गेली की या प्रकल्पातील माशांसाठी वापरण्यात येत असलेल्या रसायनयुक्त खाद्यामुळे पाण्याची दुर्गंधी येऊ लागते. मे महिन्याच्या शेवटी व जून महिन्याच्या सुरुवातीला पाऊस पडण्याच्या अगोदर ही समस्या मोठ्या प्रमाणात जाणवू लागते.
खडकवासला धरणात हेच पाणी येते जे पिण्यासाठी वापरले जाते. तसेच पानशेत धरणाच्या कडेने असलेल्या खेडेगावांमध्ये याच पाण्याचा पिण्यासाठी पुरवठा केला जातो. अनेक वेळा नागरिकांनी, ग्रामपंचायतींनी या प्रकल्पामुळे पाण्याचा उग्र वास येत असल्याबाबत प्रशासनाकडे तक्रारी केलेल्या आहेत मात्र प्रशासनाने या समस्येकडे गांभीर्याने लक्ष दिलेले नाही.
त्या अहवालाचे झाले काय?..... नागरिकांच्या तक्रारींवरुन वेल्हे तालुक्याचे तत्कालीन तालुका आरोग्य अधिकारी डॉ अंबादास देवकर यांनी प्रत्यक्ष पाहणी करुन पाणी दुषीत होत असल्याबाबत सविस्तर अहवाल वरिष्ठांना पाठविला होता मात्र पुढे त्याबाबत काहीही कारवाई झाली नाही. सदर प्रकल्पामागे काही मोठ्या राजकीय व्यक्तींचा वरदहस्त असल्याने कारवाई दडपली जाते असे स्थानिक नागरिकांचे म्हणणे आहे.
तसेच उघडपणे तक्रार केल्यास आपण तोंडावर येऊ शकतो अशी भीतीही नागरिक व्यक्त करतात. याबाबत वेळीच वरिष्ठ अधिकाऱ्यांनी लक्ष घालून कार्यवाही केली नाही तर भविष्यात पिण्याच्या पाण्याची गंभीर समस्या निर्माण होऊ शकते."सदर प्रकल्पाबाबत यापूर्वी काही अहवाल आलेला असल्यास त्याची माहिती घेतली जाईल. पाणी दुषीत होत असेल तर त्याबाबत कारवाई करण्याचा अधिकार महाराष्ट्र प्रदुषण नियंत्रण महामंडळ व मत्स्य व्यवसाय विकास विभागाला आहे." डॉ. ज्ञानेश्वर हंकारे, जिल्हा आरोग्य अधिकारी, पुणे जिल्हा परिषद.
"पाटबंधारे विभागाच्या शिफारशीनुसार संबंधित मत्स्य पालन प्रकल्पास परवाणगी देण्यात आलेली आहे. पाण्याचे प्रदुषण होत असल्याबाबत पाटबंधारे विभागाने कळविल्यास संबंधित प्रकल्पाला दिलेली परवानगी रद्द करण्यात येईल." अविनाश नाखवा, सहाय्यक आयुक्त, मत्स्य विकास विभाग, पुणे.