पुण्यातील बांधकाम व्यावसायिक अनिरुद्ध देशपांडे यांच्यावर प्राप्तीकर विभागाचा छापा | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

ED

पुण्यातील बांधकाम व्यावसायिक अनिरुद्ध देशपांडे यांचे कार्यालय आणि निवासस्थानावर बुधवारी प्राप्तीकर विभागाने छापा टाकला.

ED Raid : पुण्यातील बांधकाम व्यावसायिक अनिरुद्ध देशपांडे यांच्यावर प्राप्तीकर विभागाचा छापा

पुणे - बांधकाम व्यावसायिक अनिरुद्ध देशपांडे यांचे कार्यालय आणि निवासस्थानावर बुधवारी प्राप्तीकर विभागाने छापा टाकला. देशपांडे यांच्यासह विभागाने शहरात एकूण सहा ठिकाणी छापेमारी केली आहे.

देशपांडे हे ‘सिटी कॉर्पोरेशन लिमिटेड’चे व्यवस्थापकीय संचालक आहेत. ‘लवासा’ या प्रकल्पात देशपांडे यांचा देखील सहभाग होता. या कारवाईत विभागाच्या पथकाने काही कागदपत्रे, इलेक्ट्रॉनिक साधने जप्त केली आहेत. आर्थिक गैरव्यवहाराच्या संशयावरून विभागाने छापे टाकण्यात आल्याची माहिती समोर आली आहे.

देशपांडे यांच्या सिटी कॉर्पोरेशन लिमिटेड या कंपनीचे डेक्कन जिमखाना भागात कार्यालय आहे. तर हडपसर भागातील अमानोरा पार्क परिसरात दुसरे कार्यालय आहे. सिटी कॉर्पोरेशनमार्फत पुण्यात अनेक रहिवासी आणि व्यावसायिक जागांचे बांधकाम प्रकल्प निर्माण करण्यात आले आहेत.

या कारवाईत प्राप्तीकर विभागाच्या दिल्ली आणि मुंबईतील अधिकाऱ्यांचे पथक सहभागी झाले होते. बुधवारी पहाटेपासूनच ही कारवाई सुरू करण्यात आली होती. देशपांडे यांच्यावर प्राप्तिकर भागाची छापेमारी झाल्यामुळे पुण्यातील उद्योग विश्वात खळबळ निर्माण झाली आहे.

विरोधी पक्षात असलेले राजकीय व्यक्ती व त्यांच्या जवळच्या व्यावसायिकांवर गेल्या काही वर्षांत सातत्याने ईडीसारख्या यंत्रणांकडून छापेमारी आली आहे. त्यामुळे विरोधकांवर दबाव आणण्यासाठी ‘सीबीआय’, ‘ईडी’ आणि प्राप्तिकर विभाग यासारख्या संस्थांचा वापर केला जात आहे, अशी चर्चा नागरिकांमध्ये या निमित्ताने पुन्हा सुरू झाली आहे.