Garbage Management : कचरा व्यवस्थापनासाठी अभियंतेच होणार सल्लागार

पुणे शहरात रोज २२०० ते २३०० टन कचऱ्याची निर्मिती होत आहे. यामध्ये सुमारे १९५० टन कचरा संकलित केला जातो, १५० टन कचऱ्यावर पुनःचक्रिकरण केले जाते.
pune municipal corporation
pune municipal corporation Sakal
Summary

पुणे शहरात रोज २२०० ते २३०० टन कचऱ्याची निर्मिती होत आहे. यामध्ये सुमारे १९५० टन कचरा संकलित केला जातो, १५० टन कचऱ्यावर पुनःचक्रिकरण केले जाते.

पुणे - पुणे महापालिकेच्या घनकचरा व्यवस्थापन विभागावरचा ताण वाढत असताना या विभागातील कर्मचाऱ्यांना, अधिकाऱ्यांना तांत्रिक कामे करता आली पाहिजेत यासाठी नॅशनल इनव्हायरमेंट इंजिनिअरिंग ॲण्ड रिसर्च इन्स्टिट्यूट (निरी) या संस्थेतील तज्ज्ञांकडून धडे दिले जाणार आहेत. त्यामुळे दरवेळेला सल्लागारावर अवलंबून असलेले अधिकाऱ्यांनाही प्रकल्पाच्या कामकाजावर लक्ष ठेवता येणार आहे.

पुणे शहरात रोज २२०० ते २३०० टन कचऱ्याची निर्मिती होत आहे. यामध्ये सुमारे १९५० टन कचरा संकलित केला जातो, १५० टन कचऱ्यावर पुनःचक्रिकरण केले जाते. तर सुमारे २०० टन कचरा निर्मितीच्या ठिकाणीच नष्ट केला जात आहे. घरोघरी जाऊन संकलित केल्या जाणाऱ्या १९५० टन कचऱ्यापैकी ८०० टन ओला, ८५० टन सुका कचरा आहे. सुमारे ३०० कचरा हा मिश्र कचरा आहे. ओल्या व सुक्या कचऱ्यावर प्रक्रिया करण्याची १५०० टन इतकी क्षमता आहे. मात्र, शहरातील कचरा प्रकल्प पूर्ण क्षमतेने चालविले जात नसल्याने कचऱ्याचे मोठे ढिगारे प्रकल्पांच्या ठिकाणी लागत आहेत. त्याचा परिणाम केंद्र शासनाच्या स्वच्छ भारत अभियानात पहिल्या पाच स्वच्छ शहरात टिकणे अवघड झाले आहे.

पुणे महापालिकेने २०१७ मध्ये निरी संस्थेसोबत करार करून महापालिकेच्या कचरा प्रक्रिया प्रकल्पांचे आॅडिट करून यंत्रणेमध्ये सुधारणा करण्यासाठी शिफारस केली होती. तसेच यामध्ये महापालिकेच्या कर्मचाऱ्यांना या प्रकल्पांमध्ये वापरल्या जाणाऱ्या मशिनची पुरेशी माहिती नाही आणि कोणत्याही प्रकल्पांचे अंतर्गत तांत्रिक लेखापरिक्षण केले नव्हते. या अहवालावर महापालिका आयुक्तांकडे सविस्तर चर्चा झाली होती. त्यामध्ये ‘निरी’चे अधिकारी प्रत्येक वेळी महापालिकेला तांत्रिक सल्ला देण्यासाठी उपलब्ध होऊ शकणार नाहीत. त्याऐवजी महापालिकेच्याच कर्मचाऱ्यांना तांत्रिकदृष्ट्या आत्मनिर्भर बनविणे योग्य राहील. पण कोरोनामुळे दोन वर्ष वाया गेल्याने या काळात प्रशिक्षण देता आले नाही. आता यास पुन्हा वेग आला आहे. पुढील दोन वर्ष ‘निरी’तर्फे कर्मचाऱ्यांना प्रशिक्षण देण्यासाठी नियुक्ती करणे आणि त्यासाठी ३५ लाख रुपये खर्चास मान्यता देण्यासाठीची प्रस्ताव स्थायी समितीसमोर ठेवण्यात आला आहे.

महापालिकेत स्वतंत्र समिती

पुणे शहरा ओला, सुक्या कचऱ्यावर प्रक्रिया केली जात आहे. यासाठी वापरल्या जाणाऱ्या मशिनचा वापर पूर्ण क्षमतेने होणे गरजेचे आहे. या समितीमध्ये विभाग प्रमुखांसह स्थापत्य, यांत्रिकी आणि विद्युत शाखेचे कार्यकारी अभियंता, कनिष्ठ अभियंता व उप अभियंता यांचा समावेश असले. हे अभियंते पर्यावरणातील तज्ज्ञ नाहीत, त्यामुळे त्यांना त्यादृष्टीने तांत्रिकदृष्ट्या सक्षमीकरण करणे आवश्‍यक आहे.

प्रशिक्षणात या गोष्टीचा असणार समावेश

- कचरा प्रकल्पांची तांत्रिक बाजू समजून घेण्यासाठी महापालिकेच्या अधिकारी, कर्मचाऱ्यांना प्रशिक्षित करणे

- यामध्ये ऑनलाइन शिक्षणासह प्रत्यक्ष प्रकल्पाच्या ठिकाणी तांत्रिक माहिती दिली जाईल

- प्रक्रिया प्रकल्पात सुधारणा कशा केल्या जाण्यात याची माहिती देणार

- क्षमता, कार्यप्रदर्शन, डिझाइन, अभियांत्रिकी, आॅपरेशन प्रक्रिया, उत्पादन गुणवत्ता, पर्यावरणीय मानदंडाचे मोजमाप याचे प्रशिक्षण

- तांत्रिक अहवाल बनविणे, कागदपत्र तयार करणे

- व्यवस्थापन समस्यांवर तांत्रिक मार्गदर्शन करणे

  • शहराची लोकसंख्या - सुमारे ५५ लाख

  • क्षेत्रफळ - ५१६ चौरस किलोमीटर

  • दैनंदिन कचरा निर्मिती - २२०० ते २३०० टन

  • सुक्या कचरा प्रक्रिया प्रकल्पांची संख्या - १३

  • ओला कचरा प्रक्रिया प्रकल्प संख्या - ९

  • कचरा वाहतुकीसाठी वापरले जाणारी वाहने - ६९८

‘कचरा प्रकल्पांबाबत अडचणी आल्यावर निरीसारख्या संस्थांशीसंपर्क साधला जात होता. पण या महापालिकेच्या अभियंत्यांनाच तांत्रिकदृष्ट्या आवश्‍यक प्रशिक्षण दिल्याने अडचणी सोडविणे, प्रस्ताव तयार करणे, त्यासाठीची आवश्‍यक कागदपत्र तयार करणे अशी कामे करणे शक्य होणार आहे. यामुळे घनकचरा विभागाचे सक्षमीकरण होऊन शहराच्या कचरा व्यवस्थापनात सुधारणा होईल.’

- आशा राऊत, उपायुक्त, घनकचरा व्यवस्थापन विभाग

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com