
Pune Crime News: बेकायदा अफूची शेती करणाऱ्या दोघांना ठोकल्या बेड्या
उंड्री : होळकरवाडी (ता. हवेली) परिसरात बेकायदा केल्या जात अफूच्या शेतीवर लोणी काळभोर पोलिसांनी छापा टाकून उद्ध्वस्त करीत दोन शेतकऱ्यांना बेड्या ठोकल्या. ११ लाख ६० हजारांची तब्बल १३७४ अफूची झाडे पोलिसांनी जप्त केली.
पोलिसांनी सांगितले की, होळकरवाडी परिसरात औताडेवाडीकडून होळकरवाडी जाणाऱ्या ओढ्यातील चिमणी तलावाच्या शेजारी गव्हाच्या शेतात अफूची शेती केली जात असल्याची माहिती सूत्रांकडून मिळाली.
त्यानुसार पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत बुधवारी (दि. 1 मार्च, 2023) दुपारी होळकरवाडी येथील सर्व्हे नंबर १८० आणि सर्व्हे नंबर १८३ येथे बेकायदा केली अफूच्या शेतीवर कारवाई केली. या वेळी दोन्ही शेतमालकांना पोलिसांनी एनडीपीएस कायद्यानुसार कारवाई करत अटक केली आहे.
लोणी काळभोर पोलीस स्टेशनचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक दत्तात्रय चव्हाण, पोलीस उपनिरीक्षक अमोल घोडके, पोलीस नाईक अमित साळुंके, बाजीराव वीर, शैलेश कुदळे, मगेश नानापुरे यांच्या पथकाने ही दमदार कारवाई केली.
गुन्ह्याचा पुढील तपास पोलिस उपनिरीक्षक अमित गोरे हे करत आहेत.