
Pune : ‘सकाळ’तर्फे पुणेकर नाट्यरसिकांना मेजवानी
पुणे - रंगभूमीवर प्रेम करणाऱ्या पुणेकर नाट्यरसिकांसाठी खास ‘नाट्य’मेजवानी पेश करण्यात येणार आहे. येत्या १८ ते २२ मे दरम्यान ‘सकाळ’तर्फे नाट्य महोत्सवाचे आयोजन केले असून वैविध्यपूर्ण विषयांवरील पाच दर्जेदार नाटकांचा आस्वाद यात रसिकांना घेता येणार आहे.
जंगली महाराज रस्त्यावरील बालगंधर्व रंगमंदिरात दररोज रात्री ९.३० वाजता हा महोत्सव पार पडेल. मराठी रंगभूमीवरील आघाडीचे कलाकार प्रशांत दामले, चंद्रकांत कुलकर्णी, भरत जाधव, कविता लाड-मेढेकर, वर्षा उसगावकर,
केदार शिंदे, संकर्षण कऱ्हाडे, प्राजक्त देशमुख आदींचा कलाविष्कार महोत्सवाच्या निमित्ताने अनुभवता येणार आहे. या महोत्सवादरम्यान मराठी रंगभूमीवर अतुलनीय योगदान देणाऱ्या एका ज्येष्ठ कलाकाराचा ‘नाट्यगौरव पुरस्कार’ प्रदान करून सन्मान करण्यात येणार आहे. तसेच, एका पडद्यामागील कलाकाराच्या योगदानाचाही विशेष पुरस्कार देऊन गौरव केला जाणार आहे.
पाच दिवस चालणाऱ्या या महोत्सवाची दैनंदिन आणि सीझन, अशा दोन्ही प्रकारांत तिकिटे उपलब्ध असतील. दैनंदिन तिकिटे bookmyshow.com या संकेतस्थळावर उपलब्ध आहेत.
तसेच, दैनंदिन व संपूर्ण महोत्सवाची तिकिटे ९५९५८३०५५५ या क्रमांकावर संपर्क साधून आरक्षित करता येणार आहेत. संपूर्ण महोत्सवाची तिकिटे आरक्षित करणाऱ्या रसिकांना तिकिटांच्या दरात भरघोस सवलत देणार आहे. तसेच, दैनंदिन तिकिटांसाठीही विशेष सवलत देणार आहे. प्रत्यक्ष नाट्यगृहावरही तिकिटे लवकरच उपलब्ध होतील.
रसिकांचेही ‘पदार्पण’
‘सकाळ माध्यम समूहा’ने आपल्या उपक्रमांमध्ये कायमच सामाजिक भान जपले आहे. या नाट्य महोत्सवातही तीच परंपरा कायम राखत एक अनोखी सामाजिक बांधिलकी जपण्याचा प्रयत्न केला जाणार आहे. आजवर कधीही नाटक न पाहिलेल्या काही प्रेक्षकांना महोत्सवातील नाटके आवर्जून दाखवण्यासाठी निमंत्रित केले जाणार आहे.
‘सारखं काहीतरी होतंय’
‘एका लग्नाची
पुढची गोष्ट’
‘तू तू मी मी’
‘संगीत देवबाभळी’
‘नियम व अटी लागू’
महोत्सवाचे तपशील...
कधी : १८ ते २२ मे
केव्हा : दररोज रात्री ९.३० वाजता
कुठे : बालगंधर्व रंगमंदिर, जंगली महाराज रस्ता
वैशिष्ट्ये काय?
विविध विषयांवरील पाच दर्जेदार नाटकांचा समावेश
मराठी रंगभूमीवरील आघाडीच्या कलाकारांचा सहभाग
रंगभूमीवर अतुलनीय योगदान दिलेल्या कलाकाराचा सन्मान
कधीही नाटक न पाहिलेल्या रसिकांना सामावून घेण्याचा विशेष प्रयत्न
विद्यार्थ्यांना तिकीट दरात भरघोस सवलत
संपूर्ण महोत्सवाचे तिकीट घेतल्यास विशेष सवलत