पॉर्न अ‍ॅडिक्शनमुळे मुलांवरील दुष्परिणामांवर उपाय शोधणार | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

child porn addiction

नेट आणि पॉर्न अ‍ॅडिक्शनमुळे मुलांवर होणाऱ्या दुष्परिणामांवर उपाय शोधून त्यावर काम करण्यासाठी एक पथदर्शी कार्यक्रम राबविण्यात येणार आहे.

Dnyandevi Pune Childline : पॉर्न अ‍ॅडिक्शनमुळे मुलांवरील दुष्परिणामांवर उपाय शोधणार

पुणे - नेट आणि पॉर्न अ‍ॅडिक्शनमुळे मुलांवर होणाऱ्या दुष्परिणामांवर उपाय शोधून त्यावर काम करण्यासाठी एक पथदर्शी कार्यक्रम राबविण्यात येणार आहे. त्यासाठी महापालिका आयुक्त, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी, पोलिस आणि संबंधित तज्ज्ञांची समिती गठित करण्याबाबत सल्ला घेण्यात येणार असल्याची माहिती ज्ञानदेवी पुणे चाईल्डलाईनकडून देण्यात आली.

ज्ञानदेवी पुणे चाईल्डलाईनला २६ मार्च रोजी २२ वर्षे पूर्ण होत आहेत. या संदर्भात ज्ञानदेवी पुणे चाईल्डलाईनच्या मानद संचालिका अनुराधा सहस्रबुद्धे म्हणाल्या, लहान मुला-मुलींच्या अत्याचाराबाबत भीषणता दिवसेंदिवस वाढतच आहे. परंतु सरकारकडून चाईल्डलाईनचे कामकाज महिला बाल कल्याण विभागाकडे सोपविण्यात येणार असल्याची चर्चा सुरू आहे. तसेच, राज्यातील चाईल्डलाईन कार्यकर्त्यांना अत्यल्प वेतन मिळत असून, अनुदान मिळण्यास विलंब होत आहे.

याबाबत पंतप्रधान, राज्यसभा खासदार, महिला बालकल्याण मंत्री, महिला बालकल्याण आयुक्त यांना निवेदने देण्यात आली. परंतु अद्याप उत्तर प्राप्त झालेले नाही. त्यामुळे चाईल्डलाईन कार्यकर्त्यांमध्ये असुरक्षिततेची भावना निर्माण झाली आहे. याकडे गांभीर्याने न पाहिल्यास देशातील सुमारे ११ हजार कर्मचारी बेरोजगार होतील. तसेच, लाखो मुलांचे एकमेव आशास्थान धोक्यात येईल, अशी भीती त्यांनी व्यक्त केली.

निदर्शनास आलेल्या ठळक बाबी -

 • बालविवाहाची प्रकरणे वाढली, मात्र ७१ लग्ने थांबविण्यात यश आले.

 • पालकांतली भांडणे, घटस्फोट यामध्ये भरडल्या गेलेल्या मुलांच्या प्रकरणात वाढ.

 • मुलांकडून पॉक्सोमध्ये अडकविण्यासाठी प्रयत्न

 • आई-वडिलांच्या विभक्त होण्यानंतर दुसऱ्या व्यक्तीशी संबंध. बाललैंगिक शोषण, घरकामासाठी वापर.

 • वाईट संगतीत सापडल्यामुळे व्यसनाधिनता, आरोग्याचे प्रश्न.

 • भरोसा सेलच्या माध्यमातून पोलिसांचे योग्य सहकार्य

 • शाळांकडून चाईल्डलाईनची माहिती देण्याबाबत उत्तम सहकार्य

देशभरात पुणे चाईल्डलाईनचे काम चांगल्या प्रकारे सुरू आहे. वेळीच मदत आणि समुपदेशन होत असल्यामुळे पीडित मुला-मुलींना न्याय मिळण्यास मदत होत आहे. अशा परिस्थितीत हे काम सरकारी यंत्रणेकडे सोपविण्यापूर्वी सरकारने चर्चा करूनच योग्य निर्णय घ्यावा.

- अनुराधा सहस्रबुद्धे, मानद संचालिका, ज्ञानदेवी पुणे चाईल्डलाईन.

पुणे आणि पिंपरी-चिंचवडमधील स्थिती (जानेवारी २०२२ ते फेब्रुवारी २०२३)

 • लैंगिक शोषण ७४

 • प्रेमप्रकरणे १४

 • शारीरिक व मानसिक अत्याचार २०७

 • पळून गेलेल्या मुली २२

 • संस्थात्मक शोषण शाळा, निवारे ७०

 • बालकामगार ९४

 • आईवडिलांच्या भांडणामुळे पीडित ६३

 • बालभिकारी ५४

 • बालविवाह ७१

 • आत्महत्या ११

 • व्यसनाधिनता १८

 • एकूण अत्याचारातून मुक्तता ४७२

 • मानसिक आधार, मार्गदर्शन १७२

 • सायबर गुन्ह्यांचे बळी २२

 • हरवलेली मुले ४८