पै पै जमा करून उभारलेला संसार उद्‌ध्वस्त 

flood_bridge 11.JPG
flood_bridge 11.JPG

पुणे :  पै- पै जमवून उभा केलेला संसार काही क्षणांत वाहून गेला. त्यामुळे आता करायचे काय, असा प्रश्‍न शिवाजीनगरमधील जुना तोफखाना परिसरातील रहिवाशांना पडला आहे. नदीकाठाजवळ राहणाऱ्या आणि पुराचा फटका बसलेल्या 167 कुटुंबांतील 764 जणांची व्यवस्था शिवाजीनगर गावठाणातील महापालिकेच्या शाळा क्रमांक 14 मध्ये सध्या करण्यात आली आहे. तात्पुरता निवारा मिळाला तरी, भविष्याचा प्रश्‍न त्यांच्या चेहऱ्यावर दिसून येतो. 
शाळेतील एका वर्गात सध्या सात-आठ कुटुंबे राहतात. त्यांच्याशी संवाद साधल्यावर अनेक जण पुराच्या धसक्‍यातून बाहेर पडलेले नाहीत, असे जाणवले. छायाबाई मोहिते म्हणाल्या, ""पुराचे पाणी जेव्हा परिसरात व घरात शिरले तेव्हा मी कागद गोळा करण्याचे काम करीत होते. घरात पुराचे पाणी शिरतेय, असे मला मोबाईलवर समजले. त्याच क्षणी हातातले काम सोडून धावत घराकडे निघाले.'' आम्ही कार्यकर्त्यांच्या मदतीने कसेबसे आमचे जीव वाचवून बाहेर पडलो. पण आमच्या डोळ्यांदेखत संसार वाहून जात होता आणि आम्ही हतबल झालो होतो.'' अंगावर कपड्यानिशी आम्ही रस्त्यावर आलो. वरुणराजाची आमच्यावर अवकृपा झाल्याने होते नव्हते ते सर्व पाण्याने वाहून नेले, आता भविष्याची काळजी सतावत आहे. असे सांगताना छायाबाईंच्या डोळ्यांत पाणी आले. 
या रहिवाशांना "मी द चेंज' संस्थेचे अध्यक्ष रणजित शिरोळे यांच्याकडून ब्लॅंकेटचे वाटप, बहुजन समाज पार्टीकडून चहा, नाश्‍ता, रॉबिन हूडकडून अन्नदान, पुणे विद्यापीठ राष्ट्रीय सेवा संघाकडून न्याहारीची मदत करण्यात आली. अग्निशमन दल, मनपा पेन्शन विभाग, मारवाडी समाज आदी संघटनांही या रहिवाशांना मदत केली. या रहिवाशांना पालिकेमार्फत पाणी टॅंकर, फिरते ऍम्ब्युलन्स व अन्नदानाची सुविधा पुरवली जात असल्याचे नगरसेविका ज्योत्स्ना एकबोटे यांनी सांगितले. 

'' वीस ते पंचवीस वर्षांपासून आम्ही या ठिकाणी राहत आहोत. दरवर्षी पुराचे पाणी घरात शिरते. मात्र ते गुडघ्यावर असते. यंदा मात्र कहर झाल्याने आमचा संसार उघड्यावर पडला आहे. मुलांच्या शाळेचेही नुकसान होत आहे. दरवेळी पुनर्वसन करणार म्हणून आशा दाखवली जाते. मात्र पदरी फक्त निराशाच पडत आहे. प्रशासनाने आमच्या समस्येची दाखल घेऊन आम्हाला चांगल्या सदनिका या परिसरात बांधून द्याव्यात, अशी आमची मागणी आहे. ''
- आक्कूबाई मोरे, पूरग्रस्त 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com