#PuneFlood पार्सल जेवण, कॅब सेवेला फटका

सकाळ वृत्तसेवा
मंगळवार, 6 ऑगस्ट 2019

इतर दिवसांच्या तुलनेत आज कमी ऑर्डर्स आल्या. रस्ते व सोसायट्यांमध्ये पाणी घुसल्यामुळे काही ठिकाणी ऑर्डर पुरविणे अवघड झाले. पुणे व पिंपरीला जोडणारे पूल बंद असल्याने औंधला ऑर्डर देणे शक्‍य झाले नाही. 
- नवीन परदेशी, आशापुरी डायनिंग हॉल

पुणे - पावसामुळे रस्त्यारस्त्यांवर झालेली वाहतूक कोंडी, वाहतुकीस बंद केलेले पूल, सोसायट्यांमध्ये शिरलेले पाणी यामुळे जेवणाचे पार्सल पुरविणाऱ्या कंपन्यांच्या सेवेला सोमवारी फटका बसला. याबरोबरच ओला, उबर या कॅब सेवाही विस्कळित झाली. 

शहरात स्विग्गी, झोमॅटो व उबेर इट या कंपन्या घरपोच जेवणाची सेवा देतात. सोमवारी पाऊस, वाहतूक कोंडी, ठिकठिकाणी साचलेले पाणी यामुळे या कंपन्यांच्या सेवेवर परिणाम झाला.  

पुणे आणि पिंपरी चिंचवडमध्ये पाणी साचल्याने अनेक रस्ते बंद करण्यात आले होते. मुख्य रस्ते बंद झाल्याने पर्यायी मार्गांवर वाहतुकीचा ताण आला. त्यामुळे एखाद्याने कंपनीकडे जेवणाची ऑर्डर दिल्यानंतर वेळेत डिलिव्हरी होत नव्हती. पाणी साचलेल्या ठिकाणावरून ऑर्डर आल्यास डिलिव्हरी बॉयला तिथपर्यंत पोचणे शक्‍य होत नव्हते. त्यामुळे अनेकांना जेवण मिळणे मुश्‍कील झाले. अशीच स्थिती ओला व उबेर या कॅब सेवेची होती. कॅब बुक केल्यानंतर संबंधित ठिकाणी चालकांना वेळेत पोचता येत नव्हते. त्यामुळे पाणी साठलेल्या किंवा वाहतूक कोंडी असलेल्या ठिकाणाहून कॅब बुक झाल्यास चालक ट्रिप रद्द करीत होते. परिणामी, कॅबची संख्या कमी झाल्याने भाडे दुप्पट झाले होते, अशी माहिती ओलाकडून देण्यात आली. 

कसबा, मंगळवार पेठ, जुना बाजार, औंध, बाणेर, पाटील इस्टेट, खडकी, बोपोडी, वाकड, हिंजवडी आणि नदीकाठच्या परिसरात ही समस्या जास्त प्रमाणात जाणवली. वाकड परिसरात दुपारनंतर कोणतीही कंपनी जेवण पुरविण्यास तयार नव्हती. ‘सकाळ’च्या एका प्रतिनिधीने स्विग्गीवरून औध परिसरात जेवणाची ऑर्डर दिली. ऑर्डर दिल्यानंतर पार्सल नेमके कुठे द्यायचे, याबाबत हॉटेलमधून फोन आला. पत्ता सांगितल्यानंतर त्या ठिकाणी डिलिव्हरी देण्यास उशीर होईल, असे स्पष्ट करण्यात आले. तसेच काही परिसरात जेवण पुरविणे शक्‍य नसल्याची माहिती डिलिव्हरी बॉयने दिल्याचे हॉटेलचालकाने सांगितले.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Pune Flood Parcel Food Cab Service Stop