
शिवाजीराव भोसले सहकारी बँक गैरव्यवहार प्रकरणी अटकेत असलेले राष्ट्रवादी काँग्रेसचे विधानपरिषदेचे माजी आमदार अनिल भोसले यांचा जामीन अर्ज न्यायालयाने चौथ्यांदा फेटाळला आहे.
Bail Rejected : माजी आमदार अनिल भोसले यांचा जामीन चौथ्यांदा फेटाळला
पुणे - शिवाजीराव भोसले सहकारी बँक गैरव्यवहार प्रकरणी अटकेत असलेले राष्ट्रवादी काँग्रेसचे विधानपरिषदेचे माजी आमदार अनिल भोसले यांचा जामीन अर्ज न्यायालयाने चौथ्यांदा फेटाळला आहे. विशेष न्यायाधीश आर. एन. हिवसे यांनी हा आदेश दिला. बँकेतील ४९६ कोटी ४४ लाख रुपयांच्या अपहारप्रकरणी भोसले यांच्यासह सातजणांविरुद्ध दोषारोपपत्र दाखल आहे.
या प्रकरणात भोसले यांसह १६ जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. भोसले हे सध्या न्यायालयीन कोठडीत आहे. त्यामुळे जामीन मिळण्यासाठी भोसले यांच्यावतीने अर्ज करण्यात आला. न्यायालयात न्यायवैद्यक लेखा परीक्षा अहवाल दाखल झाला आहे. समता तत्त्वांच्या कारणावरून तसेच त्यांच्यावर असणाऱ्या दायित्वापेक्षा जास्त रक्कम वसूल झाली असल्याने भोसले यांना जामीन मंजूर करण्यात यावा, असा युक्तिवाद भोसले यांच्याकडून करण्यात आला. भोसले यांनी एकाच वेळी मुंबई उच्च न्यायालय आणि पुणे विशेष न्यायालयात जामिनासाठी अर्ज केला आहे. दोन्ही न्यायालयापुढे याबाबतची माहिती लपवून न्यायालयाची फसवणूक करत असल्याचा युक्तिवाद मूळ फिर्यादी व गुंतवणूकदारांचे वकील अॅड. सागर कोठारी यांनी केला.
तसेच, न्यायवैद्यक लेखा परिक्षा अहवालाबाबत आमदार भोसले यांचे सामूहिकरीत्या ४९६ कोटी रुपयांपेक्षा जास्त असून त्यांच्या पत्नी रेश्मा भोसले यांसह १२ जणांना अद्याप अटक झाली नाही. केवळ न्यायवैद्यक लेखा परीक्षा अहवाल दाखल झाला म्हणून घडामोडीत बदल झाला असे म्हणता येणार नाही. आमदार भोसले यांच्या प्रभावामुळे लेखा परिक्षकाविरुध्द कारवाई झाल्याचे निदर्शनास आणून देत अॅड. कोठारी यांनी जामिनास आक्षेप घेतला. तसेच सरकार पक्षातर्फे अतिरिक्त सरकारी वकील विलास पठारे यांनी बाजू मांडली. दरम्यान या पूर्वी भोसले यांनी वैद्यकीय कारणास्तव केलेली तात्पुरत्या जामिनाची मागणी आर.एन. हिवसे न्यायालयाने फेटाळली होती.