esakal | Pune: वकील असल्याचे भासवून फ्लॅटधारकांची फसवणूक
sakal

बोलून बातमी शोधा

pune

Pune : वकील असल्याचे भासवून फ्लॅटधारकांची फसवणूक

sakal_logo
By
सकाळ वृत्तसेवा

पुणे : वकील असल्याचे भासवीत बनावट दस्त नोंदणी करून शासन, बिल्डर आणि फ्लॅटधारकांची फसवणूक केल्याप्रकरणी पती-पत्नीचा अटकपूर्व जामीन न्यायालयाने फेटाळला. सत्र न्यायाधीश जी. जी. भालचंद्र यांनी हा आदेश दिला.

प्रसन्न अरुण शिरूडकर (वय ४८) आणि शर्वरी प्रसन्न शिरूडकर (वय ४६, दोघे रा. मोशी) अशी जामीन फेटाळलेल्या पती-पत्नीची नावे आहेत. या प्रकरणी अमित दत्तात्रेय घुले (वय ४२, रा. हवेली) यांनी फिर्याद दिली. फिर्यादी २८ एप्रिल रोजी दुय्यम निबंधक कार्यालय हवेली क्र.२५ दापोडी येथे ओळखीच्या वकिलाला भेटायला गेले असता शिरूडकर दांपत्याशी त्यांची ओळख झाली. त्यांनी फिर्यादींशी ओळख वाढवून तुमचे दस्त करून देतो असे सांगून त्यांचा विश्वास संपादन केला.

दोघेही वकील नसताना त्यांनी वकील असल्याचे सांगितले. तुमच्या १३ फ्लॅटची नोंदणी करून देतो असे, सांगून फिर्यादींकडून सातबारा उतारा आणि फ्लॅट विक्रीचे मूळ दस्त घेऊन सात फ्लॅटचे १८ व १९ एप्रिल या दोनच दिवसात दापोडी येथे बनावट रेरा व पीएमआरडीए नोंदणीची कागदपत्रे बनवली आणि नोंदणी केली. त्यामुळे आरोपींनी फिर्यादीसह शासनाची १३ लाख आठ हजार रुपयांची फसवणूक केल्याप्रकरणी पती-पत्नीविरूद्ध भोसरी पोलिस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल केला आहे. या गुन्ह्यात अटकपूर्व जामीन मिळण्यासाठी त्यांनी अर्ज केला होता. त्यास सरकारी वकील प्रेमकुमार अगरवाल यांनी विरोध केला.

loading image
go to top