पुण्यात अडीच हजार कैदी क्षमतेचे नवीन कारागृह

दिलीप कुऱ्हाडे
गुरुवार, 26 एप्रिल 2018

पुणे : येरवडा मध्यवर्ती कारागृहात तीस बराकींमध्ये 2323 कैदी क्षमता आहे. मात्र याठिकाणी तब्बल पाच हजार कैदी दाटीवाटीने राहत अाहेत. त्यामुळे कारागृह प्रशासनाने नव्याने होणाऱ्या पिंपरी-चिंचवड पोलिस आयुक्तालयासाठी नवीन कारागृह बांधण्याचा प्रस्ताव तयार केला होता. मात्र पिंपरी-चिंचवडमध्ये कारागृहासाठी आवश्‍यक पंधरा एकर जागा उपलब्ध नसल्याचे जिल्हाधिकाऱ्यांनी कळविले. त्यामुळे कारागृह प्रशासनाने नव्याने येरवडा कारागृह मुद्रणालय कर्मचारी वसाहतीच्या मागील बाजूस अडीच हजार कैदी क्षमेतेचे नवीन कारागृह बांधण्याचा प्रस्ताव तयार केल्याचे अधिकृत सूत्रांनी सांगितले.

येरवडा मध्यवर्ती कारागृहाचे सध्या 65 एकराचे क्षेत्रफळ आहे. तर एकूण कैदी क्षमता 2323 असताना सध्या कारागृहात पाच हजार कैदी आहेत. कारागृहातील सर्कल एक, तीन आणि टिळक यार्डात प्रत्येकी आठ बराक, सर्कल दोन मध्ये सहा बराक तर किशोर विभागात तीन बराक आहेत. यासह अंडा सेल, फाशीची शिक्षा सुनावलेले कैदी, रुग्ण कैदी, ज्येष्ठ नागरिक कैदी, विदेशी कैदी अशांना दाटीवाटीने विविध बराकींमध्ये ठेवले आहे. त्यामुळे कारागृहातील कैद्यांची गर्दी पाहता कारागृह प्रशासनाने पिंपरी-चिंचवड पोलिस आयुक्तालयासाठी नवीन कारागृहाचा प्रस्ताव तयार करून गृहविभागाकडे पाठविला होता.

मात्र पिंपरी-चिंचवडमध्ये कारागृहासाठी आवश्‍यक पंधरा एकर जागा उपलब्ध नसल्याचे जिल्हाधिकाऱ्यांनी कारागृह प्रशासनाला कळविले होते. 

कारागृह प्रशासनाने नव्याने येरवडा कारागृहाच्या मोकळ्या जागेत अडीच हजार कैदी क्षमेतेचे नवीन कारागृह बांधण्याचा नवीन प्रस्ताव गृहविभागाला पाठविला आहे. येरवडा कारागृहाच्या ताब्यात सध्या पाचशे एकर जागा आहे. यामध्ये येरवडा मध्यवर्ती कारागृह, महिला कारागृह, येरवडा खुले कारागृह, दौलतराव जाधव तुरूंगाधिकारी प्रशिक्षण महाविद्यालय, कारागृह कर्मचारी व अधिकारी निवासस्थाने, कारागृह मुद्रणालय, कारागृह मुद्रणालय कर्मचारी वसाहत आणि शेतीची जागा आहे.

कारागृह मुद्रणालय कर्मचारी वसाहतीच्या मागील बाजूस कारागृहासाठी आवश्‍यक जागा असल्याचे तेथे नवीन कारागृह बांधण्याचा प्रस्ताव तयार केल्याचे समजते.

कारागृह बांधण्याचे काम पोलिस गृहनिर्माण संस्थेला
राज्य सरकारच्या नवीन अध्यादेशाप्रमाणे राज्यातील पोलिस किंवा कारागृहा संबंधीचे कामे आता सार्वजनिक बांधकाम विभागाच्या ऐवजी पोलिस गृहनिर्माण संस्थेला देण्यात येणार आहे.त्यामुळे नवीन कारागृह पोलिस गृहनिर्माण संस्था बांधणार आहे. त्यासंबंधी गृहनिर्माण संस्थेच्या पदाधिकाऱ्यांनी जागेची पाहणी करून गेल्याचे अधिकृत सूत्रांनी सांगितले.

Web Title: Pune to get new central jail in addition to yerwada jail