दोस्ती, दुनियादारीतील राजा माणूस | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

MP Girish Bapat

गेली चार दशके बापट यांनी कसब्यावर नेता म्हणून नव्हे, तर तुमच्या आमच्यातला कार्यकर्ता म्हणून राज्य केले. बापट यांच्यासाठी कोणताही राजकीय पक्ष वर्ज्य नव्हता. सर्वच पक्षांत त्यांचे मैत्रीचे, अत्यंत जवळचे संबंध होते.

Girish Bapat Death : दोस्ती, दुनियादारीतील राजा माणूस

पुणे - घोरपडी पेठेतील बादशहा सय्यद... लोहियानगरमधील मामू भजीवाला.... नाना पेठेतील अशोक... सदाशिव पेठेतील अनिल... नारायण पेठेतील शिरीष असो की रविवार पेठेतील गजानन... असे राजकीय, सामाजिक, व्यापारी आणि सर्वच स्तरांतील नागरिकांचे खासदार गिरीश बापट यांच्याशी अत्यंत जवळचे सबंध होते, हेच त्यांच्या राजकीय यशाचे गमक होते. खांद्यावर हात टाकून हक्काने विचारपूस करणार, मित्रांना बोलवून साबुदाणा खिचडी, मिसळ, मटार उसळ, दडपे पोहे, भजी असे चमचमीत पदार्थ आवडीने खाऊ घालणार असा हा नेता ‘दिल, दोस्ती आणि दुनियादारी’तला राजा माणूस होता.

गेली चार दशके बापट यांनी कसब्यावर नेता म्हणून नव्हे, तर तुमच्या आमच्यातला कार्यकर्ता म्हणून राज्य केले. बापट यांच्यासाठी कोणताही राजकीय पक्ष वर्ज्य नव्हता. सर्वच पक्षांत त्यांचे मैत्रीचे, अत्यंत जवळचे संबंध होते. जातीच्या पलीकडे जाऊन त्यांनी जाणीवपूर्वक संबंध निर्माण केले होते. त्यामुळे १९९५ पासून कसबा आणि बापट हे समीकरण जुळले होते. शहरात कॉंग्रेसची एकहाती सत्ता असतानाही कसब्यात मात्र बापट यांचे वर्चस्व होते. त्यांची कार्यशैली पाहून नेहमीच ‘आदमी सही, लेकिन पार्टी गलत’, असे बापट यांच्याबाबत चेष्टेने म्हटले जात असे. मतदार संघातील कोणाच्या घरी दुःखद घटना घडली, तर न विसरता पत्र पाठवून सांत्वन करणार, वाढदिवस असेल तर आठवणीने पोस्टकार्ड पाठवून शुभेच्छा देणारा, कट्ट्यावर बसून सर्वांशी जवळीक साधत आपुलकी निर्माण करणारा हा नेता होता.

लोकसभेची उमेदवारी २०१९ मध्ये मिळाल्यानंतर कसब्याचा वारसदार कोण, असा प्रश्‍न निर्माण झाला. मुक्ता टिळक यांच्या निधनानंतर नुकत्याच झालेल्या पोटनिवडणुकीत पक्षाला कसब्यात पराभव पत्कारावा लागला. अत्यंत चुरशीच्या या लढाईची बापट यांच्या अनुपस्थितीची चर्चा होती.

या निकालावर राष्ट्रवादीचे नेते शरद पवार यांनी दिलेली प्रतिक्रिया अत्यंत बोलकी होती. ‘कसबा हा भाजपचा नव्हे, तर बापटांचा बालेकिल्ला होता’, आणि तेच खरे होते. बापट यांच्या निधनाने आज तरुणांचा मित्र, ज्येष्ठांचा साथीदार, महिलांचा भाऊ आणि कष्टकऱ्यांचा आधार हरपला आहे.

अखेरपर्यंत पक्षनिष्ठा सर्वोतोपरी...

महापालिकेच्या १९८५ मध्ये झालेल्या निवडणुकीत भाजपकडून गिरीश बापट, काँग्रेसकडून शांतिलाल सुरतवाला आणि पुरोगामी लोकशाही दलाकडून (पुलोद) अंकुश काकडे सभागृहात निवडून आले. तेव्हापासून ‘गॅस’ (गिरीश, अंकुश आणि शांतिलाल) म्हणून महापालिकेत हे त्रिकुट ओळखले जाऊ लागले.

त्या वेळी झालेल्या महापौरपदाच्या निवडणुकीत पुलोदकडून उल्हास ढोले-पाटील यांना उमेदवारी मिळाली होती. त्यांच्याविरोधात काँग्रेसकडून शांतिलाल सुरतवाला यांना उमेदवारी देण्यात आली होती. या तिघांच्या मैत्रीमुळे बापट आणि काकडे यांची मते सुरतवाला यांच्याकडे जाणार अशी चर्चा होती.

ढोले-पाटील यांनीदेखील याबाबत शरद पवार यांच्याकडे शंका उपस्थित केली होती. तेव्हा ‘बापट हे कधी पक्ष सोडून मत देणार नाहीत,’ असे पवार यांनी त्यांना सांगितले. महापौरपदाच्या निवडणुकीत ढोले-पाटील विजयी झाले. तेव्हा पवार यांनी सांगितले, तसेच घडले. सुरतवाला यांच्याशी मैत्री असूनही बापट यांनी पक्षादेश मोडला नाही. परंतु या तिघांच्या मैत्रीत कधी बाधा आली नाही.

नुकत्याच झालेल्या पोटनिवडणुकीत तब्येत साथ देत नसतानाही तशाही अवस्थेत बापट यांनी आपल्या पद्धतीने पक्षाचे उमेदवार हेमंत रासने यांचा प्रचार सुरू ठेवला होता. अखेरच्या श्वासापर्यंत बापट यांनी आपली पक्षनिष्ठा कायम ठेवली.

टॅग्स :Girish Bapatpunedeath