
Pune : स्व. गोपीनाथ मुंढे उद्यानापासून श्रीराम चौकापर्यंत रस्ता उखडला
उंड्री : काळेबोराटेनगर भुयारी मार्गातून हांडेवाडी चौक, उंड्री-पिसोळीकडे जाणाऱ्या स्व. गोपीनाथ मुंढे उद्यानापासून श्रीराम चौकापर्यंत पावसाळी वाहिनी टाकण्यासाठी रस्त्याची खोदाई केली. मात्र, डांबरीकरण योग्य पद्धतीने केले नसल्याने रस्ता उखडला असून, अर्ध्या रस्त्यातून वाहने ये-जा करीत असल्याने अपघातसदृशस्थिती निर्माण झाली आहे. पालिका प्रशासनाने या रस्त्याची तातडीने दुरुस्ती करावी, अशी मागणी स्थानिक नागरिकांनी केली आहे.
ठेकेदाराने पावसाळी वाहिनी टाकल्यानंतर डांबरीकरण योग्य पद्धतीने केले नाही. त्यामुळे रस्ता उखडला असून, संपूर्ण वाहतूक सध्या अर्ध्या रस्त्याने होत आहे. या रस्त्याच्या दोन्ही बाजूला गृहनिर्माण सोसायट्या असून, काळेबोराटेनगर भुयारी मार्गातून हांडेवाडी चौक, उंड्री-पिसोळी, सातवनगर, महंमदवाडीकडे जाणाऱ्या वाहनांची या रस्त्यावर प्रचंड वर्दळ असल्याने अपघाताचा धोका वाढला आहे. संबंधित ठेकेदाराने रस्त्याचे काम योग्य पद्धतीने केले की नाही, याची पाहणी पालिका अधिकाऱ्यांकडून का केली नाही, अशी विचारणा दिलीप निघोल, डॉ. अनिल पाटील, योगेंद्र गायकवाड, संजय भुजबळ, अलोक गायकवाड, विनीत थोरात, गणेश ताम्हाणे, गणेश वाडकर यांनी केली आहे.
सय्यदनगर-हांडेवाडी चौक दरम्यान रस्त्याची ठिकठिकाणी चाळण झाली आहे. डीपी रस्ते उखडले आहेत, पथदिवे नसल्याने वाहनचालकांना अपघाताचा धोका वाढला आहे.
-अर्जुन सातव, सातवनगर
दरम्यान, हडपसर क्षेत्रीय कार्यालयातील सहायक आयुक्त म्हणाले की, मुख्य खात्याकडून काम केले आहे. संबंधितांकडे पाठपुरावा करून रस्त्याचे काम लवकरच मार्गी लावले जाईल.