भाज्यांची उच्चांकी आवक

भाज्यांची उच्चांकी आवक

पुणे - भोगी आणि मकरसंक्रांत, त्यातच रविवार आल्यामुळे गुलटेकडी मार्केट यार्डातील भाजीपाला बाजारात वर्षभरातील उच्चांकी आवक झाली. मात्र, मागणीदेखील चांगली राहिल्यामुळे भाजीपाल्याच्या दरात नेहमीपेक्षा आज तेजी राहिली. मोठ्या प्रमाणावर आवक झाल्याने तसेच खरेदीदारांच्या गर्दीमुळे बाजाराचा आवार आणि मार्केट यार्ड परिसरातील वाहतूक दुपारपर्यंत विस्कळित झाली होती.

दर रविवारी गुलटेकडी मार्केट यार्डात सुमारे १५० ते १६० गाड्यांची आवक होते. मात्र उद्या (सोमवारी) भोगी आणि मंगळवारी (ता. १५) मकरसंक्रांत आल्यामुळे शेतकऱ्यांनी मोठ्या प्रमाणावर भाजीपाला बाजारात विक्रीसाठी आणला. नेहमीपेक्षा शंभर ट्रक अधिक भाजीपाल्याची आवक झाली. 

भोगीच्या दिवशी शेंग-सोलाण्याची विशिष्ट भाजी करण्याची परंपरा आहे. या भाजीसाठी चवळी, पापडी, वांगी, गाजर, वालवर, भुईभूग, मटार, पावटा, गव्हाच्या ओव्या, हरभरा, बोरे यांना मोठी मागणी असते. या काळात भाजीपाल्याला चांगला दर मिळतो, म्हणून शेतकरीही या सणांसाठी भाजीपाला राखून ठेवतात आणि सणाच्या आधी बाजारात माल आणण्यास पसंती देतात. 

हे दोन्ही सण आणि रविवारमुळे शेतकरी मोठ्या प्रमाणावर भाजीपाला आणणार, हे माहिती असल्यामुळे बाजार समितीनेदेखील सुविधा उपलब्ध करून दिल्या होत्या. शनिवार रात्रीपासूनच बाजारात भाज्यांची आवक सुरू झाली. तर आज सकाळापासून महिलांची खरेदीसाठी मोठी गर्दी झाली होती. त्यामुळे वाहतुकीच्या नियोजनासाठी पोलिसांबरोबरच बाजार समिती कर्मचारीदेखील रस्त्यावर उतरले होते.

यासंदर्भात अडते असोसिएशनचे अध्यक्ष विलास भुजबळ म्हणाले, ‘‘या सणांना जादा भाव मिळत असल्याने शेतकरी अधिक माल बाजारात आणणे पसंत करतात. त्यामुळे आज आवक वाढली आहे. वर्षातील ही सर्वात मोठी आवक आहे. त्यामुळे काल रात्रीपासूनच शेतमालाचे व्यवहार करण्यास बाजार समितीनेदेखील परवानगी दिली होती.’’

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com