
पुणे शहरात गेल्या काही दिवसांपासून लहान मुले ताप, सर्दी, खोकल्याने आजारी पडण्याचे प्रमाण झपाट्याने वाढले आहे.
H3-N2 Infection : लसीकरणाअभावी लहान मुलांना ताप
पुणे - शहरात गेल्या काही दिवसांपासून लहान मुले ताप, सर्दी, खोकल्याने आजारी पडण्याचे प्रमाण झपाट्याने वाढले आहे. यातील बहुतांश मुलांना ‘एच३-एन२’चा संसर्ग झाल्याचे निदान वैद्यकीय तज्ज्ञ व्यक्त करत आहे. कोरोना उद्रेकात गेल्या दोन वर्षांमध्ये फ्लू प्रतिबंधक लसीकरण झाले नसल्याने लहान मुलांमध्ये हा आजार वाढला आहे. विषाणुजन्य आणि जिवाणूंच्या संसर्गाने रुग्णालयात दाखल कराव्या लागणाऱ्या लहान मुलांचे प्रमाण गेल्या दोन आठवड्यांच्या तुलनेत वाढल्याचे निरीक्षणही त्यांनी नोंदविले.
बालरोग तज्ज्ञ संघटनेचे माजी राष्ट्रीय अध्यक्ष डॉ. प्रमोद जोग म्हणाले, ‘‘पुण्यात २००९ मध्ये स्वाइन फ्ल्यूचा उद्रेक झाला होता. त्यावेळी ‘एच१-एन१’ हा इन्फ्लूएंझाचा विषाणू होता. आता ‘एच३-एन२’ या नवीन विषाणूंचा संसर्ग लहान मुलांना होत असल्याचे दिसते. कमी-जास्त प्रमाणात हे विषाणू हवेत असतात. याच्या संसर्गामुळे सुरवातीला ताप येतो. नंतर सर्दी, खोकला येतो. तीन ते पाच दिवसांमध्ये ताप कमी होतो. मात्र, सर्दी-खोकला दोन ते तीन आठवडे राहतो. मात्र, हा विषाणू घातक नाही. सध्या ‘एच३-एन२’ सोबतच ‘अॅडिनो’ या विषाणूंच्या संसर्गाचेही रुग्ण आढळतात.’’ कुपोषण किंवा इतर आजारामुळे निर्माण झालेल्या गुंतागुंतीमुळे लहान मुलांना उपचारासाठी रुग्णालयात दाखल करावे लागते. फक्त विषाणू संसर्गाच्या उपचारासाठी रुग्णाला दाखल करावे लागत नाही, असेही त्यांनी स्पष्ट केले.
फ्ल्यू प्रतिबंधक लस
फ्ल्यू हा मुलांचा आजार आहे. फ्ल्यू प्रतिबंधक लशीमुळे हा आजार रोखता येतो. गेल्या दोन वर्षांमध्ये कोरोना उद्रेकात या प्रतिबंधक लस बहुतांश जणांनी घेतली नाही. त्यामुळे फ्ल्यू विरोधातील प्रतिकारशक्ती राहीली नाही. त्यामुळे हा आजार वाढला आहे. फ्ल्यूचा विषाणू स्वतःमध्ये सातत्याने बदल करतो. फ्ल्यूचा नवीन व्हेरियंट आला की नवीन लस येते. त्यासाठी पालकांनी आपल्या मुलांना ही लस आवर्जून द्यावी. तसेच, जोखमीच्या रुग्णांनीही दर वर्षी ही प्रतिबंधात्मक लस घ्यावी, असा सल्ला वैद्यकीय तज्ज्ञांनी दिला आहे.
मुलांमुळे मोठ्यांना धोका
फ्ल्यूच्या आजाराचा संसर्ग हा लहान मुलांकडून मोठ्या माणसांकडे होतो. त्यामुळे मधुमेह, उच्च रक्तदाब, गर्भवती, दमा, छातीचे विकार असलेल्या रुग्णांना याच्या संसर्गाचा धोका सर्वाधिक असतो.
वैद्यकीय सल्ल्यानेच औषधे घ्या
हा विषाणूजन्य आजार असल्याने प्रतिजैविकांची फारशी गरज लागत नाही. मुख्यतः ताप आणि खोकला कमी करणारी औषधे पालकांनी वैद्यकीय सल्ल्यानुसारच द्यावी. दोन-तीन दिवस ताप न उतरल्यास मनाने प्रतिजैविके घेण्याचा टाळा, असेही डॉक्टरांनी सांगितले.
‘एन३-एन२’ची लक्षणे
ताप
खोकला
सर्दी किंवा बंद नाक
अंग दुःखी
उलट्या
अशक्तपणा
अशी घ्या काळजी...
विश्रांती घ्या
ताजा आणि सात्त्विक आहार घ्या
सर्दी-खोकल्यामध्ये कोमट पाण्याच्या गुळण्या करा
हे करा....
भरपूर पाणी प्या
साबणाने हात स्वच्छ धुवा
शिंकताना, खोकताना तोंडावर रुमाल धरा
घराबाहेर पडताना मास्क वापरा
काही लहान मुलांना खूप जास्त ताप येतो. त्यापैकी काही जणांना उपचारासाठी रुग्णालयात दाखल करावे लागते. त्यांची ‘एच३-एन२’ निदान चाचणी करण्यात येते. त्यापैकी बहुतांश जणांना या विषाणूंचा संसर्ग झाल्याचे निदान होते. पण, ही मुले व्यवस्थित बरी होत आहेत. ही रोगनिदान चाचणी फक्त रुग्णालयात दाखल मुलांचीच केली जाते. बाह्यरुग्ण विभागात आलेल्यांची चाचणी करण्याचा सल्ला दिला जात नाही.
- डॉ. श्रीनिवास तांबे, बालरोगतज्ज्ञ, संजीवनी व्हिटालाइफ मेडिपॉइंट रुग्णालय
उपचारातील गुंतागुंत वाढत नाही
सूर्या रुग्णालयातील बालरोगतज्ज्ञ डॉ. सचिन शहा म्हणाले, ‘सध्या रुग्णालयात न्यूमोनिया आणि छातीच्या संसर्गामुळे अतिदक्षता विभागात दाखल होणाऱ्या लहान मुलांचे प्रमाण वाढले आहे. श्वसन संस्थांशी संबंधित विषाणूंचा संसर्ग हे त्यामागील प्रमुख कारण आहे. फक्त ‘एच३-एन२’पेक्षा जीवाणूंच्या संसर्गामुळे दाखल होणाऱ्यांचे प्रमाण जास्त आहे. त्यामुळे ‘एच३-एन२’मुळे घाबरून जाण्याचे कारण नाही. बाह्यरुग्ण विभागात येणाऱ्या लहान मुलांच्या प्रमाणात निश्चित वाढ झाली आहे. पण, त्यातून उपचारातील गुंतागुंत वाढत नाही.’