Pune News : जास्त तापमानाचा हापूसला फटका Pune Hapus hit high temperature Hapus mangoes great demand | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Pune News

Pune News: जास्त तापमानाचा हापूसला फटका

Pune News : साडेतीन मुहूर्तांपैकी एक आणि हिंदू नववर्ष अर्थात गुढीपाडवा सणाच्या नैवद्यासाठी आणि आमरस बनवण्यासाठी हापूस आंब्याला मोठी मागणी असते.

मात्र हापूस आंब्याला हवामान बदलाचा फटका बसला असून, फळावर डाग पडत आहेत. दुसऱ्या टप्प्यात आंब्याचे चांगले पीक निघेल, असा अंदाज शेतकरी व्यक्त करत आहेत.

बाजारात रत्नागिरी, सिंधुदुर्ग, रायगड तसेच परराज्यांतून कर्नाटक आणि केरळ येथून आंब्याची आवक होत आहे. यंदा पहिल्या टप्प्यातील हापूस बाजारात मोठ्या प्रमाणात दाखल होत आहे.

त्यामुळे पुणेकरांना गुढीपाडव्याच्या मुहूर्तावर मागील वर्षीच्या तुलनेत हापूस काही प्रमाणात स्वस्त मिळणार आहे. पहिल्या हापूस मोहोराचे उत्पादन कमी असेल तरी बाजारात सध्या आवक चांगली असल्याची माहिती व्यापाऱ्यांनी दिली. (Pune News)

फळबाजारात मंगळवारी कोकणातून सुमारे १००० ते १५०० पेट्यांची आवक झाली. तसेच व्यापारीही खास पाडव्यासाठी हापूस तयार करून ठेवत असतात. बाजारातून खरेदी करून किरकोळ विक्री करण्यासाठी अनेक व्यापारी गुढीपाडव्याचा मुहूर्त साधतात.

असा बसला फटका...

  • पावसाळा लांबल्याने पालवीचे प्रमाण सर्वाधिक

  • नोव्हेंबर, डिसेंबरमध्ये आलेल्या मोहोराचे शेतकऱ्यांनी रक्षण केल्याने आंबा बाजारात

  • काही ठिकाणी आंब्यावर बुरशीजन्य रोगाची लागण

  • जास्त तापमानाचा फटका बसल्याने आंबा भाजला

  • तापमानातील उच्चांकामुळे आंब्यावर काळे डाग

  • वातावरणातील बदलामुळे मोहोर गळण्याच्या प्रकारात वाढ

  • गतवर्षीपेक्षा यंदा ३० ते ४० टक्के उत्पादन घटणार

विक्रीसाठी परराज्यातील तरुण

या काळात पश्चिम बंगाल, बिहार, झारखंड, छत्तीसगड या भागांतून उदरनिर्वाह करण्यासाठी तरुण पुण्यात येतात. हे सर्व जण मार्केट यार्डातून आंबा खरेदी करून पुणे शहर व उपनगरात रस्त्यावर उभे राहून विकतात.

त्यामुळे पुण्यातील पारंपरिक खरेदीदारांना मोठ्या प्रमाणावर स्पर्धा करावी लागत आहे. याचा फायदा शेतकऱ्यांना होत असल्याचे व्यापाऱ्यांनी सांगितले.

वादळ आणि पावसाने काहीही नुकसान झालेले नाही. नोव्हेंबर, डिसेंबरच्या फुटीमध्ये आंब्याची मोठ्या प्रमाणात गळ झाली आहे. त्यात रस कमी आहे. दुसऱ्या-तिसऱ्या टप्प्यातील आंबा आता मे महिन्यात मोठ्या प्रमाणात येईल. जास्त तापमानामुळे आंबा भाजला.

- गणेश झगडे,शेतकरी, रत्नागिरी

१५ एप्रिलनंतर रत्नागिरी, रायगड, सिंधुदुर्ग या जिल्ह्यांतील खाडी भागातून आंब्याची आवक मोठ्या प्रमाणात वाढेल. दुसऱ्या बहरात मालाची आवक जास्त राहील. बाजारात सध्या दररोज दोन हजार पेट्यांची आवक होत आहे. मागील वर्षीच्या तुलनेत यंदा काही प्रमाणात आंबा स्वस्त आहे. हापूस सर्वसामान्यांच्या आवाक्यात येईल.

- अरविंद मोरे,व्यापारी, मार्केट यार्ड