
Pune News: वातावरणातील बदलामुळे आरोग्याची काळजी घ्यावी
उंड्री : मागिल काही दिवसांपासून वातावरणातील बदलामुळे आरोग्यावर परिणाम होत आहे. सर्दी, खोकला, ताप, फ्लूसारखे आजार टाळण्यासाठी वेळीच उपचार करून घ्यावेत, तसेच उघड्यावरचे पदार्थ खाणे टाळणे सर्वांच्याच हिताचे ठरणार आहे, असा सल्ला वैद्यकीय तज्ज्ञांनी दिला आहे.(Pune News)
डॉ. शंतनू जगदाळे म्हणाले की, उपनगर आणि लगतच्या गावामध्ये थंडी, ताप, सर्दी खोकल्याचे आजार बळावत आहेत. ढगाळ वातावरणामुळे रोगराई पडण्याची भीती नागरिकांनी व्यक्त केली. मात्र, नागरिकांनी घाबरून न जाता वेळीच डॉक्टरांकडून उपचार करून घ्यावेत, पाणी उकळून प्यावे, प्रवास टाळावा, कोरोनाचे सावट पुन्हा येऊ नये यासाठी प्रत्येकाने स्वतःच काळजी घेणे गरजेचे आहे. हवामानातील बदलामुळे बाहेरचे तेलकट व इतर पदार्थ खाण्याचे टाळणे गरजेचे आहे.
डॉ. राजेश पाटील यांनी सांगितले की, हवेतील गारठ्यामुळे दम्याचा त्रास असलेल्यांना आणि हाडांचे रोग, संधीवात असलेल्या व्यक्तींना त्रास होण्याची शक्यता आहे. या पावसाळी हवेमुळे अंगदुखी, उत्साह नसल्यासारखे वाटणे, डोके दुखणे आदी आजारही उद्भवण्याची शक्यता आहे. मागिल काही दिवसांपासून, हवेत उष्मा होता. त्यानंतर लगेचच हवामान बदल होऊन थंडीत वाढ झाली, त्यामुळे ज्येष्ठ नागरिक आणि लहान मुलांची काळजी घेतली पाहिजे.
डॉ. आनंद कांबळे म्हणाले की, सकाळ-दुपारी कडक ऊन, ढगाळ वातावरण दमेकरींना श्वसनाचा त्रास जाणवला. त्यामुळे उष्ण वातावरणातून थंड वातावरणात संक्रमणात दम्याच्या रुग्णांनी अधिक काळजी घेणे गरजेचे आहे. ऋतुबदलामुळे सर्दी, खोकला व त्यातून होणारे संसर्गजन्य आजारही वाढले आहेत. त्याचा परिणाम लहान मुले व वृद्धांवर जाणवत आहे, असे त्यांनी स्पष्ट केले.
दरम्यान, महापालिकेचे विभागीय वैद्यकीय अधिकारी डॉ. दीनेश बेंडे म्हणाले की, सकाळी-सायंकाळी थंडी आणि दुपारी उन असते, त्यामुळे वातावरणातील बदलामुळे शारीरिक त्रास होतो. रस्त्यावर धुळीचे प्रमाण वाढले आहे, त्यामुळे प्रत्येकाने मास्क वापरावा, दुचाकीचालकांनी हेल्मेटचा वापर करावा, योगासन, प्राणायाम करावेत, जंकफूड, फास्टफूड टाळावेत, असा सल्ला त्यांनी दिला.