
Pune : एमपीएससीच्या इतिहासातील `सर्वोच्च’ परीक्षा
पुणे - संयुक्त पूर्व परीक्षा २०२३ ही महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या इतिहासातील पदे आणि उमेदवारांची संख्येचा विक्रम मोडणारी परीक्षा ठरली आहे. तब्बल आठ हजार १६९ पदांसाठीच्या पूर्व परीक्षेत साडे चार लाखांपेक्षा जास्त उमेदवारांना प्रवेश देण्यात आला होता.
ही परीक्षा सुरळीत पार पडली असून राज्यात कोठेही अनुचित प्रकार घडला नाही. मात्र, काही केंद्रांवर बायोमेट्रीक उपस्थिती नोंदविण्यास अडचण आल्याचे निदर्शनास आले आहे.
रविवारी (ता. ३०) महाराष्ट्र अराजपत्रित गट-ब व गट-क सेवा संयुक्त पूर्व परीक्षा पार पडली. राज्यातील ३७ जिल्हा केंद्रांवर पार पडलेल्या परीक्षेसाठी उमेदवारांनी सकाळीच हजेरी लावली होती. यावेळी उमेदवारांचे बायोमेट्रिक उपस्थिती नोंदवित प्रवेश देण्यात आला.
ज्या केंद्रांवर काही अडचणीमुळे बायोमेट्रिक उपस्थिती नोंदवू न शकणाऱ्या उमेदवारांचे कोणतेही नुकसान होणार नाही, असा खुलासा आयोगाच्या वतीने करण्यात आला आहे.
राज्य शासनाच्या विविध विभागातील एकूण ८,१६९ पदे भरलीया परीक्षेद्वारे भरली जाणार आहे. आयोगामार्फत विज्ञापित केलेली आतापर्यंतची ही सर्वोच्च पदसंख्या आहे. तसेच अर्ज सादर करणाऱ्या उमेदवारांची संख्या देखील आयोगाच्या इतिहासातील सर्वोच्च संख्या आहे.
- महाराष्ट्र लोकसेवा आयोगाचे अधिकृत ट्वीटर हॅंडल
बायोमॅट्रीक व्यवस्था अपुरी पडली...
एमपीएससीच्या वतीने बायोमेट्रीक पद्धतीने हजेरी घेण्यात आली. मात्र, अनेक केंद्रांवर बायोमेट्रीक संयंत्रात त्रुटी असल्याने उमेदवारांना त्रास सहन करावा लागला होता. आयोगाने पुढील वेळेस निर्दोष संयंत्रांसह प्रशिक्षीत मनुष्यबळाचा पुरवठा करावा, असा आग्रह उमेदवारांनी धरला आहे.
संयुक्त पूर्व परीक्षा थोडक्यात..
उमेदवारांची संख्या ः ४,६७,०८५
परीक्षा केंद्रे ः १,४७५
उपस्थिती ः ८० टक्के