
Pune : हिवरे तर्फे नारायणगाव येथील शेतात आढळला मृत बिबट्या
नारायणगाव : हिवरे तर्फे नारायणगाव येथील भोर वस्ती शिवारात आज (ता.२५) सकाळी सुमारे एक ते दीड वर्ष वयाचा नर बिबट्या मृत अवस्थेत आढळला.मृत बिबट्याला माणिकडोह येथील निवारा केंद्रात शवविच्छेदन करण्यासाठी नेण्यात आले आहे. अशी माहिती वनक्षेत्रपाल अजित शिंदे यांनी दिली.
हिवरे तर्फे नारायणगाव येथील शेतकरी संतोष दत्तात्रय भोर यांच्या गव्हाच्या शेतात आज सकाळी नऊ वाजण्याच्या सुमारास बिबट्या मृत अवस्थेत आढळला.याबाबतची माहिती स्थानिक शेतकरी नितीन भोर, रेस्क्यू टीम सदस्य किरण वाजगे यांनी वनक्षेत्रपाल अजित शिंदे यांना दिली.त्या नंतर घटनास्थळी वनरक्षक रामेश्वर फुलवाड, वन कर्मचारी खंडू भुजबळ, विश्वास शिंदे यांनी भेट देऊन मृत बिबट्याचा पंचनामा केला. शवविच्छेदना नंतर बिबट्याच्या मृत्यूचे कारण समजेल. अशी माहिती वनक्षेत्रपाल शिंदे यांनी दिली.
पिंजरा लावण्याची मागणी : दरम्यान स्थानिक शेतकरी
वसंतात्या भोर, संतोष भोर, नितीन भोर, ईश्वर अडसरे, रामदास भोर, ओंकार भोर, प्रसाद भोर, तानाजी भोर, बाळू भोर म्हणाले या भागात बिबट्याची संख्या वाढली असून पाळीव प्राण्यांवर हल्ले वाढले आहेत. पाळीव कुत्री ,शेळ्या मेंढ्या, वासरे बिबट्यांनी फस्त केली आहेत. बिबट्याचे दर्शन हे नित्याचे झाले आहे. जीव धोक्यात घालून शेती मशागतीची कामे करावी लागतात. बिबट्याना जेरबंद करण्यासाठी पिंजरा लावण्याची मागणी शेतकऱ्यांनी वनविभागाकडे केली आहे.