
Pune : इंदापुर पोलिसांनी पकडला 18 लाख 8 हजाराचा गुटखा ; दोघांना अटक,
इंदापूर : इंदापूर पोलीस स्टेशन हद्दीत अकलूज ते इंदापूर महामार्गावरून अवैद्य प्रतिबंधित सुगंधी पान मसाला गुटखा याची बेकायदेशीरित्या वाहतूक होत असताना पोलिसांनी कारवाई करत तब्बल 18 लाख 8 हजार 800 रुपयांच्या गुटख्यासह 24 लाख 8 हजार 800 रुपयांचा मुद्देमाल जप्त करीत याप्रकरणी दोघांना ताब्यात घेण्यात आल्याची माहिती इंदापूरचे पोलीस निरीक्षक दिलीप पवार यांनी दिली.
याबाबत पवार यांनी दिलेल्या माहितीनुसार अकलूज इंदापूर मार्गावरून गुटख्याची अवैध वाहतूक होत असल्याची गोपनीय माहिती मिळाल्यानंतर सहाय्यक पोलीस निरीक्षक नागनाथ पाटील, सहाय्यक पोलीस निरीक्षक योगेश लंगुटे, पोलीस हवालदार सुनील बालगुडे व पोलीस शिपाई विकास राखुंडे यांच्या पथकाने कारवाई करीत बुधवार (ता.29) रोजी रात्री 9 च्या दरम्यान बावडा ते इंदापूर
महामार्गावरती सापळा रुचून एक संशयित पिकअप गाडी (नंबर MH 13 DQ 2496) तपासणी मध्ये मानवी जीवितास अपायकारक असा 18 लाख 8 हजार 800 रुपयांचा अवैध प्रतिबंधित सुगंधी पान मसाला गुटखा व एक जुनी वापरती 6 लाख रुपये किमतीची पिकअप असा एकूण 24 लाख 8 हजार 800 रुपयांचा मुद्देमाल सदर कारवाई मध्ये जप्त करण्यात आला.
याप्रकरणी गाडी चालक व त्याचा साथीदार अशा दोघांना ताब्यात घेऊन इंदापूर पोलीस स्टेशन येथे भारतीय दंड संहिता, अन्न सुरक्षा व मानके अधिनियम 2006 तसेच महाराष्ट्र राज्य अन्न व सुरक्षा आयुक्त यांचा प्रतिबंधित आदेश चे उल्लंघन या अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
सदरची कारवाई पुणे ग्रामीणचे पोलीस अधीक्षक अंकित गोयल, अप्पर पोलीस अधीक्षक आनंद भोईटे, उपविभागीय पोलीस अधिकारी, गणेश इंगळे यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली. याबाबतचा पुढील तपास पोलीस निरीक्षक दिलीप पवार यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस निरीक्षक नागनाथ पाटील हे करीत आहेत.