Pune : भारत-आफ्रिका : सहा दिवस चालणार उपक्रम संयुक्त लष्करी सरावाला सुरुवात Pune: India-Africa Six-day joint military exercise begins | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

 India-Africa

Pune : भारत-आफ्रिका : सहा दिवस चालणार उपक्रम संयुक्त लष्करी सरावाला सुरुवात

पुणे : भारत आणि आफ्रिका खंडातील २३ राष्ट्रांच्या दुसऱ्या संयुक्त क्षेत्र प्रशिक्षण (फिल्ड ट्रेनिंग) सरावाला मंगळवारपासून औंधमधील परदेशी प्रशिक्षण विभागात सुरुवात झाली. डेझर्ट कोअरचे कोअर कमांडर लेफ्टनंट जनरल राकेश कपूर यांनी या वेळी विविध देशांतील तुकड्यांना संबोधित केले.

हा संयुक्त सराव, भारत आणि आफ्रिका यांच्यात २००८ मध्ये झालेल्या भारत-आफ्रिका शिखर परिषदेनंतर आफ्रिकेशी अधिकाधिक संपर्क कायम राखण्याच्या भारताच्या प्रयत्नांचा भाग आहे. मानवतावादी दृष्टिकोनातून भूसुरुंग निकामी करणे आणि शांतता प्रस्थापित करणे ही या सरावाची संकल्पना आहे.

हा सराव चार टप्प्यांत विभागण्यात आला आहे. सामरिक कवायती आणि कारवाई संयुक्तपणे करण्याची क्षमता हा या संयुक्त सरावाचा केंद्रबिंदू आहे. याबरोबरच २८ ते ३० मार्च दरम्यान लष्कर प्रमुखांची परिषद आयोजित करण्यात आली आहे.

संयुक्त राष्ट्रांच्या शांतता कायम राखण्याच्या कार्यात कार्यक्षमता आणि सज्जता यांच्यात सुधारणा करण्याच्या दृष्टीने सहभागी राष्ट्रांमधील लष्करी सहकार्य महत्त्वपूर्ण आहे.या दरम्यान हे लष्करप्रमुख संयुक्त सरावाची पाहणी करतील. सरावादरम्यान स्वदेशी उपकरणांचा अधिकाधिक वापर करण्यावर भर दिला जाईल.

या राष्ट्रांच्या तुकड्यांचा सहभाग

या प्रशिक्षण सरावात इथिओपिया, घाना, केनिया, लेसोथो, निजर, सेशेल्स, टांझानिया, युगांडा, झांबिया, बोत्सवाना, कॅमेरून, काँगो, इजिप्त, इस्वाटिनी/स्वाझीलंड, मलावी, नायजेरिया, रवांडा, सेनेगल, झिम्बाब्वे आणि मोरोक्को या राष्ट्रांच्या तुकड्या आणि प्रतिनिधी सहभागी होत आहेत.