#PuneIssue बेबी कालव्याची दुरुस्ती केव्हा?

Pune-Issue
Pune-Issue

पुणे : मुंढवा जॅकवेल येथून शेतीसाठी पूर्ण क्षमतेने पाणीपुरवठा करण्यासाठी बेबी कालव्याची दुरुस्ती आवश्‍यक आहे. या कालव्यातून पाण्याची गळती रोखण्यासाठी सुमारे 81 किलोमीटरपर्यंत त्याचे अस्तरीकरण करण्याचा प्रस्ताव जलसंपदा विभागाकडे पडून आहे. अस्तरीकरणाचे काम पूर्ण झाल्यानंतर जलसंपदा विभाग मुंढवा जॅकवेलमधून साडेपाचशे एमएलडी पाणी उचलू शकतो. 

जलसंपदा विभागाने खडकवासला धरणातून महापालिकेला प्रति दिन साडेअकराशे एमएलडी पाणीपुरवठा करण्याची भूमिका घेतल्यानंतर शहरातील पाणीपुरवठा विस्कळित झाला होता. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी जलसंपदा विभागाला आदेश देऊन शहराला साडेतेराशे एमएलडी पाणीपुरवठा करण्यास सांगितले. त्यामुळे शहरातील पाणीपुरवठा सुरळीत होऊ लागल्याचे चित्र दिसत आहे. मात्र, जलसंपदा आणि महापालिका यांच्या वादातून मुंढवा जॅकवेल येथील पाण्याचा मुद्दा समोर आला आहे. जलसंपदा विभाग आणि महापालिका यांच्यात झालेल्या करारानुसार, महापालिका प्रति दिन साडेपाचशे एमएलडी सांडपाण्यावर प्रक्रिया करून ते मुंढवा येथील बेबी कालव्यात सोडण्यात येणार होते; परंतु बेबी कालव्यात केवळ साडेतीनशे एमएलडी पाणी सोडले जात आहे. दोन वर्षांत जलसंपदा विभागाने केवळ सहा टीएमसीच पाणी मुंढवा जॅकवेल येथून उचलल्याचा दावा महापालिका आणि पुण्यातील स्वयंसेवी संस्थांकडून केला जात आहे. 

बेबी कालवा हा जुना कालवा असून, दोन वर्षांपूर्वी या कालव्याचे काम केले होते. या कालव्यातून सोलापूर रस्त्यावरील यवत, केडगाव आदी गावांपर्यंत शेतीला पाणीपुरवठा केला जातो. या गावांच्या पुढे वरवंडपर्यंत पाणी एक ते दोन वेळाच सोडले गेले. कालव्यातून गळती होत असून, तो पूर्ण क्षमतेने वाहू शकत नाही. पुरेसा दाब न मिळाल्याने पाणी जास्त लांबपर्यंत पोचू शकत नाही. कालव्याची वहन क्षमता वाढविण्यासाठी त्याचे अस्तरीकरण करणे आवश्‍यक आहे. कालव्याच्या अस्तरीकरणाचे काम दोन टप्प्यात पूर्ण केले जाऊ शकते. यासाठी केवळ दहा कोटी रुपये इतका खर्च अपेक्षित आहे. त्याबाबतचा प्रस्तावही जलसंपदा विभागाला पाठविण्यात आला आहे, अशी माहिती प्रशासकीय सूत्रांनी दिली. 

"पालकमंत्री गिरीश बापट आणि कालव्याच्या लाभ क्षेत्रातील आमदारांनी बेबी कालव्याच्या कामासाठी आवश्‍यक तरतूद उपलब्ध करून हे काम लवकर पूर्ण करावे. यामुळे महापालिकेला दिला जाणारा दोष कमी होईल.'' 
- विवेक वेलणकर, सजग नागरिक मंच 

काय होईल अस्तरीकरणामुळे 
- कालव्याची वहन क्षमता वाढेल 
- पाण्याची होणारी गळती थांबेल 
- खराब पाण्यामुळे कालव्याजवळील जलस्रोतांचे प्रदूषण थांबेल 
- जास्त अंतरापर्यंत कालव्यातील पाणी देता येईल 
- पाणीटंचाईच्या स्थितीत उसाला हे पाणी देणे शेतकऱ्यांच्या सोयीचे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com