#PuneIssue तुमच्या जागेचा मालक कोण?

Pune-Issue
Pune-Issue

हद्दीलगतच्या गावांचा नियोजनबद्ध विकास व्हावा, यासाठी पहिल्या टप्प्यात अकरा गावे महापालिकेत घेण्यात आली. राज्य सरकारच्या या निर्णयाला आता एक वर्ष पूर्ण झाले. महापालिकेत आलेल्या नव्या पाहुण्यांना पायाभूत सुविधा पुरवून त्यांचे जीवनमान उंचाविण्याची घोषणा महापालिकेने केली. प्रत्यक्षात मात्र या वर्षात या गावांमधील साधे पानही हलले नसल्याचे पाहणीतून आढळून आले. या पार्श्‍वभूमीवर गावांच्या स्थितीचा लेखाजोखा...

पुणे - पै-पै जमवून पुण्यालगतच्या एखाद्या गावात तुम्ही जागा घेतली असेल... त्या गावाचा आता महापालिकेत समावेश झाल्याने तुमच्या जागेचा भावदेखील निश्‍चित वाढलाही असेल..?  पाच-सहा महिन्यांपासून खरेदी केलेल्या जागेकडे तुम्ही फिरकला नसेल, तर मग ती जागा जागेवर असेल; पण मालकी तुमची नसेल...!  कारण कुठल्यातरी गुंडाच्या किंवा राजकीय कार्यकर्त्यांच्या ताब्यात ती गेली असेल. त्यांच्या नावाची कागदोपत्री नोंद करून तुम्हालाच जागेतून हुसकाविण्याचा प्रयत्न केला जाईल. यामुळे तुम्ही जागा घेतली असेल, तर तिची काळजी घ्याच...! 

हडपसरमधील राजेंद्र मोरे यांना उरळी कांचन परिसरात खरेदी केलेल्या जागेबाबत असाच अनुभव आला. तत्परता आणि धाडस दाखवून त्यांनी आपली जागा पुन्हा ताब्यात घेतली; पण ज्यांनी तिचा बेकायदा ताबा मिळविला होता, त्या मंडळींच्या कुरापती अजूनही सुरूच आहेत. मोरे यांच्याप्रमाणेच इतरही अनेकांच्या जागा हडप झाल्याचा अंदाज आहे.  हद्दीलगतची अकरा गावे महापालिकेत आल्याने येथील जागांचा भाव वाढला आहे. मोकळ्या जागा शोधण्याची वेळ आली असतानाच त्यांची मागणीही वाढली. मोक्‍याच्या जागांवर डोळा ठेवून त्या बळकाविण्याचे प्रयत्न काही गुंडांकडून सुरू आहेत. त्याचा जाब विचारणाऱ्यांना दमदाटी केली जात असल्याचे उघड झाले आहे. सरकारी यंत्रणेतील अधिकारी-कर्मचाऱ्यांचे खिसे गरम करून गोरगरिबांच्या जागांची खोटी कागदपत्रे तयार करणारी टोळी सक्रिय झाली आहे. तिचे पोलिसांशीही लागेबांधे असल्याचे बोलले जात आहे.

पोलिस आणि महसूल यंत्रणेच्या बळावर गुन्हेगारी क्षेत्रातील लोक गरिबांच्या जागा लुटण्याचा प्रयत्न करत असल्याचे फुरसुंगी, उरळी देवाची आणि आजूबाजूच्या परिसरात फेरफटका मारल्यानंतर दिसून आले.

मुख्यमंत्र्यांची घोषणा हवेतच 
पुणे आणि परिसरातील गुन्हेगारांच्या मुसक्‍या आवळण्याची घोषणा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी तीन वर्षांपूर्वी एका विशेष मुलाखतीत केली होती. त्यामुळे दंडेलशाही करणाऱ्यांना खऱ्या अर्थाने वचक बसण्याची आशा नागरिकांमध्ये निर्माण झाली होती. प्रत्यक्षात मुख्यमंत्र्यांनी तशी पावले उचलली नसल्याने सामान्यांच्या जागा आणि घरे बळकाविण्याचे धाडस गुन्हेगारी क्षेत्रात वाढले असले तरीही, मुख्यमंत्र्यांना अजून आपल्या आश्‍वासनाची आठवण का झाली नाही, असा प्रश्‍न नागरिक आता उपस्थित करू लागले आहेत.

उरुळी कांचनमध्ये २०११मध्ये घेतलेल्या जागेची सर्व कागदपत्रे माझ्याकडे आहेत. मात्र, या जागेची कागदपत्रे अन्य एका व्यक्तीकडे आहेत. त्यामुळे त्यांनी जागेचा ताबा घेऊन तिथे फलक लावला आहे. तसेच या जागा विक्रीची जाहिरातही त्यांनी केली होती. याबाबत मी पोलिसांकडे तक्रार केली आहे.
- राजेंद्र मोरे, जागामालक 

जागेचा बेकायदा ताबा घेऊन मूळ मालकांना धमकाविणाऱ्याविरोधात कठोर कारवाई करण्यात येत आहे. याबाबत तक्रारी येताच चौकशी करून दोषींना ताब्यात घेतले जाते. या प्रकरणांत कोणालाही पाठीशी घातले जात नाही. मोरे यांच्या प्रकरणाचा तपास करून योग्य ती कार्यवाही करण्यात येईल. त्याबाबत स्थानिक पोलिसांना सूचना देण्यात येतील.’’
- के. व्यंकटेशम, पोलिस आयुक्त, पुणे

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com