#PuneIssues योजना मार्गी, प्रतीक्षा अंमलबजावणीची

Pune-Issue
Pune-Issue

पुणे - पीएमआरडीए, मेट्रो, रिंगरोड, आंतरराष्ट्रीय विमानतळ, स्मार्ट सिटी हे पुणे शहरावर दीर्घकालीन परिणाम करणारे मोठे प्रकल्प सुरू करण्यास गेल्या चार वर्षांत यश आले. मात्र, पीएमपीचे सक्षमीकरण, वाढीव पाणीपुरवठा, कचरा प्रक्रिया, नदी सुधारणेचा जायका प्रकल्प यासाठी पुणेकरांना आणखी काहीकाळ प्रतीक्षा करावी लागणार आहे.

गेल्या चार वर्षांत नवनवे प्रकल्प आले, पण त्यांच्या अंमलबजावणीला वेळ लागणार असल्याने ‘स्मार्ट’ पुण्याचे स्वप्न प्रत्यक्षात उतरण्यास आगामी सरकारची वाट पाहावी लागणार आहे. 

लोकसभेपासून महापालिकेपर्यंत पुणेकरांनी भाजपवर ‘शतप्रतिशत’ विश्‍वास टाकला. त्यामुळेच या सरकारकडून नागरिकांच्या मोठ्या अपेक्षा आहेत. गेल्या चार वर्षांत शहराच्या विकासासाठी आवश्‍यक असणारे काही महत्त्वाचे प्रकल्प मार्गी लागले आहेत, मात्र त्याचा वेग वाढवून हे बदल प्रत्यक्षात येण्यासाठी मोठे प्रयत्न करावे लागणार आहेत.

ही आहेत आव्हाने... 
कचरा - शहरात सध्या दररोज सुमारे बाराशे टन कचरा तयार होतो. त्यावर प्रक्रिया करण्यासाठी विशेष प्रयत्न झाले नाहीत. अस्तित्वातील प्रकल्प बंद पडल्याने कचऱ्याचा प्रश्‍न गंभीर आहे. आणखी एक कचरा प्रक्रिया प्रकल्प उभारण्यास सुरवात झाली आहे; पण तो प्रत्यक्षात कधी कार्यान्वित होणार?

वाढीव पाणी - महापालिकेत नव्याने ११ गावे समाविष्ट झाली. मात्र, त्यासाठी आवश्‍यक वाढीव पाणीपुरवठा जलसंपदा विभागाने मंजूर केला नाही. त्यामुळेच पाणीकपातीचे संकट ओढावले आहे. मुंढवा जॅकवेल प्रकल्पातून सहा टीएमसी पाणी शुद्ध करून शेतीसाठी वापरण्याचा प्रकल्पही प्रत्यक्षात येऊ शकला नाही. 

वाहतूक - पीएमपी सक्षमीकरणासाठी बसगाड्यांची संख्या वाढविणे अपेक्षित होते. गेल्या चार वर्षांत केवळ २०० मिनी बस वाढल्या आहेत; पण ब्रेकडाउनचे प्रमाण मोठे असून, बसगाड्यांची वारंवारताही कमी झाली आहे. नवीन एक हजार बस प्रस्तावित आहेत. सार्वजनिक वाहतूक व्यवस्था सक्षम नसल्याने खासगी वाहनांची संख्या वाढत आहे. 

झोपडपट्टी विकास - शहरातील ४२ टक्के नागरिकांचे वास्तव असणाऱ्या झोपडपट्ट्यांचे पुनर्वसन नियमावलीच्या लाल फितीत अडकले आहे. 

कोणते प्रकल्प मार्गी लागले
पीएमआरडीए - पुणे शहराचा विस्तार झपाट्याने वाढल्याने ‘एमएमआरडीए’च्या धर्तीवर ‘पीएमआरडीए’ची स्थापना केली असून, त्याचा विकास आराखडा तयार करण्याचे काम सुरू आहे. ‘पीएमआरडीए’च्या वतीने सात हजार हेक्‍टर जमीन विकसित करण्याचे नियोजन केले आहे.

रिंगरोडच्या लगतच इकॉनॉमिक झोनची निर्मिती केली जाणार असून, प्रकल्पात जमिनी जाणाऱ्या शेतकऱ्यांना योग्य मोबदला मिळावा, यासाठी २० टाऊनशिप उभारल्या जाणार आहेत. पाचशे ते दोन हजार हेक्‍टर क्षेत्रावर एक टीपी स्कीम असेल, असे नियोजन आहे.

विकास आराखडा - गेल्या १० वर्षांपासून रखडलेला विकास आराखडा महापालिकेकडून काढून घेऊन त्यास मंजुरी देण्याचे काम राज्य सरकारने केले आहे. विकास आराखड्यातील जागा ताब्यात घेऊन त्याचा विकास हे आव्हान राहणार आहे. 

मेट्रो - स्वारगेट ते पिंपरी-चिंचवड आणि वनाज ते रामवाडी या मेट्रोच्या मार्गाला परवानगी देऊन हे काम प्रत्यक्ष सुरू करण्यात यश आले. सध्या मेट्रो मार्गाचे ३० टक्के काम पूर्ण झाले असून, कामाचा वेग अपेक्षित वेळापत्रकानुसार चांगला आहे. याशिवाय ‘पीएमआरडीए’च्या माध्यमातून शिवाजीनगर ते हिंजवडी मेट्रो मार्गाला सरकारची मान्यता मिळाली आहे. पुणे-मुंबई हायपरलूप प्रकल्पास मान्यता मिळाली असून, पुण्याजवळ त्याचा जगातील पहिला चाचणी प्रकल्प उभारला जाणार आहे. 

रिंगरोड - शहरावर येणारा वाहतुकीचा ताण कमी करावा आणि शहराबाहेरचा भाग विकसित होण्यासाठी १२९ किलोमीटरच्या रिंगरोडला सरकारने मान्यता दिली आहे. 

आंतररराष्ट्रीय विमानतळ - गेली अनेक वर्षे केवळ चर्चेत असणाऱ्या आंतरराष्ट्रीय विमानतळास मान्यता दिली असून, पुरंदरमध्ये होणाऱ्या या विमानतळाच्या भूसंपादनाची प्रक्रिया सुरू केली आहे. लोहगाव येथील विमानतळाच्या विस्तारीकरणासाठी आवश्‍यक ती जागा मिळविण्यात यश आले असून, लवकरच त्याच्या कामाला सुरवात होणार आहे. 

स्मार्ट सिटी - स्मार्ट सिटी हा केंद्र सरकारच्या महत्त्वाकांक्षी प्रकल्पात पुण्याची निवड होऊन त्याचे काम सुरू झाले आहे. शहरात या प्रकल्पांतर्गत आतापर्यंत १०० कोटींची कामे पूर्ण झाली आहेत. ४९० कोटींची कामे प्रस्तावित आहेत. या प्रकल्पाचे दृश्‍य परिणाम विशिष्ट भागापुरतेच मर्यादित आहेत. 

या सरकारने शहर विकासासाठी धोरणात्मक निर्णय घेतले; पण त्याची अंमलबजावणी झालेली दिसत नाही.
- निवृत्त मेजर जनरल सुधीर जठार, नागरी चेतना मंच

चार वर्षांत शहरातील रस्ते, उड्डाण पूल, मेट्रो अशी पायाभूत सुविधांची कामे झालेली दिसतात. रस्त्यांची परिस्थिती सुधारली आहे. शहरातील कामे दृश्‍य स्वरूपात जाणवू लागली आहेत. वाहतुकीसाठी आणखी प्रयत्न व्हायला हवेत.
- त्रिशला राणे, नागरिक

शहरात मेट्रो, रिंगरोड, नदी सुधारणा असे वर्षानुवर्षे रखडलेले प्रकल्प आम्ही मार्गी लावले आहेत. काही कामे होण्यासाठी वेळ लागतो. पुणेकरांचे जीवनमान उंचावण्यासाठी आम्ही योजनाबद्ध प्रयत्न केले आहेत.
- गिरीश बापट, पालकमंत्री

पुणेकरांनी मोठ्या विश्‍वासाने भाजपला सत्ता दिली. पण, चार वर्षांत केवळ थापा मारण्याचे काम केले आहे. स्मार्ट सिटी, जायका अशा मोठमोठ्या घोषणा झाल्या; पण अंमलबजावणी काहीच नाही. पुणेकरांना पुरेसे पाणी देण्यातही या सरकारला अपयश आले.
- अनंत गाडगीळ, आमदार (काँग्रेस)

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com