
Kasaba Byelection : भाजप उमेदवार हेमंत रासने यांनी टिळक आणि बापट कुटुंबियांची घेतली भेट
पुणेः पुण्यातील कसबा आणि चिंचवडमध्ये होऊ घातलेल्या पोटनिवडणुकीसाठी अखेर भाजपने उमेदवार जाहीर केले आहेत. हेमंत रासने यांना भाजपने कसब्यातून उमेदवारी दिली आहे.
भाजपने चिंचवड विधानसभा मतदारसंघासाठी अश्विनी जगताप यांना उमेदवारी दिली आहे. या निवडणुकीत भाजपने दिवंगत मुक्ता टिळक यांच्या कुटुंबाला डावललं आहे.
उमेदवारी जाहीर झाल्यानंतर हेमंत रासने यांनी पुण्याचे खासदार गिरीश बापट यांच्या कुटुंबियांची भेट घेतली. गिरीश बापट हे सध्या रुग्णालयात दाखल आहेत. यावेळी बापट यांच्या सून स्वरदा बापट यांनी रासने यांना ओवाळून आगामी निवडणुकीसाठी शुभेच्छा दिल्या.
'बापट यांची प्रकृती थोडी खराब आहे, पण ते बुद्धीने तेवढेच तल्लख आहेत. त्यामुळे त्यांच्या मार्गदर्शनाखाली, कसबा विधानसभा निवडणूक लढवली जाईल,' असा विश्वास रासने यांनी उमेदवारी जाहीर होताच व्यक्त केला.
मुक्ता टिळक यांचे पती शैलेश टिळक यांनी उमेदवारी जाहीर झाल्यानंतर प्रतिक्रीया दिली आहे. बोलताना म्हणाले की, पक्षाकडे उमेदवारी मागितली होती परंतु वेगळा निर्णय घेतला गेला. पक्षाच्या या निर्णयावर त्यांनी नाराजी व्यक्त केली.