
कसबा पेठ विधानसभा मतदारसंघातील भाजपचे उमेदवार हेमंत रासने यांच्याविरोधात विश्रामबाग पोलिसांनी आचारसंहिता भंगाचा अदखलपात्र गुन्हा दाखल केला आहे.
Hemant Rasane Crime : हेमंत रासने यांच्याविरुद्ध आचारसंहिता भंगाचा गुन्हा दाखल
पुणे - कसबा पेठ विधानसभा मतदारसंघातील भाजपचे उमेदवार हेमंत रासने यांच्याविरोधात विश्रामबाग पोलिसांनी आचारसंहिता भंगाचा अदखलपात्र गुन्हा दाखल केला आहे. तर, काँग्रेसचे उमेदवार रवींद्र धंगेकर आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या उपाध्यक्षा रुपाली ठोंबरे यांच्याविरुद्ध आचारसंहिता भंग केल्याप्रकरणी निवडणूक अधिकाऱ्यांकडे तक्रार प्राप्त झाली आहे.
रासने यांनी मतदान केंद्रात भाजपचे चिन्ह असलेले उपरणे घालून मतदान केले. याविरोधात राष्ट्रवादी काँग्रेसच्या रुपाली ठोंबरे यांनी निवडणूक निरीक्षकांकडे तक्रार केली होती. मतदान केंद्राच्या १०० मीटर परिसरात पक्षाचे चिन्ह घेऊन मतदारांवर प्रभाव पडेल, अशी कृती करण्यास निर्बंध आहे. त्याचे उल्लंघन केल्यामुळे रासने यांच्यावर अदखलपात्र गुन्हा दाखल केला आहे.
दरम्यान, महाविकास आघाडीचे उमेदवार धंगेकर यांनी भाजपकडून पैसे वाटप सुरू असल्याचा आरोप करुन उपोषण केले होते. निवडणूक प्रचार संपल्यानंतर आचारसंहिता भंग केल्यामुळे त्यांच्याविरोधात तक्रार करण्यात आली आहे. तसेच, राष्ट्रवादी काँग्रेसच्या ठोंबरे यांनी मतदान यंत्राचे छायाचित्र प्रसारित करुन मतदान गोपनीयतेचा भंग केला, अशी तक्रार करण्यात आली आहे. ‘धंगेकर आणि ठोंबरे यांनी आचारसंहितेचा भंग केल्याच्या तक्रारी प्राप्त झाल्या आहेत. याबाबत दखल घेऊन कारवाई करण्यात येत आहे’, असे निवडणूक निर्णय अधिकारी स्नेहा किसवे-देवकाते यांनी सांगितले.
देवदर्शन करून आल्यानंतर प्रसारमाध्यमांशी बोलताना उपरणे गळ्यात होते. मतदान केंद्रात येताना ते तसेच राहिले. ही बाब कोणी निदर्शनास आणून दिली नाही. अजाणतेपणाने उपरणे गळ्यात राहिले. परंतु त्यानंतर ते काढून ठेवले.
- हेमंत रासने, भाजप उमेदवार.