
सदाशिव पेठ, शनिवार पेठ, नारायण पेठ, शुक्रवार पेठांमध्ये भाजपचा परंपरागत मतदार असल्याने प्रभाग क्रमांक १५ च्या जोरावर आत्तापर्यंत भाजपने विजय मिळविला होता.
Ravindra Dhangekar : सदाशिव, नारायण पेठेची धंगेकरांना साथ
पुणे - सदाशिव पेठ, शनिवार पेठ, नारायण पेठ, शुक्रवार पेठांमध्ये भाजपचा परंपरागत मतदार असल्याने प्रभाग क्रमांक १५ च्या जोरावर आत्तापर्यंत भाजपने विजय मिळविला होता. यावेळीही तेथून किमान १५ हजाराचे मताधिक्य भाजप उमेदवार हेमंत रासने यांना मिळेल असा दावा भाजपकडून केला जात होता. पण यावेळी केवळ ७ हजार २५६ चे मताधिक्य मिळाले आणि या भागातील काँग्रेसच्या मतांचा दुष्काळ दूर झाला. रवींद्र धंगेकर यांना या प्रभागातून मताधिक्य मिळाले नसले तरी गेल्या वेळेच्या तुलनेत काँग्रेसला दुप्पट मत मिळाली. धंगेकर यांचा विजय सोपा करण्यात या भागातील मतदारांनी मोलाची साथ दिली.
कसबा विधानसभा मतदारसंघात एकूण २७० बूथ आहेत. त्यापैकी सर्वाधिक बूथ हे प्रभाग क्रमांक १५ मध्ये येतात. त्यानंतर प्रभाग क्रमांक १६ (कसबा पेठ) येथे २८, प्रभाग क्रमांक १७ (रविवार पेठ रास्ता पेठ) ५५ बूथ, प्रभाग क्रमांक १८ (गुरुवार पेठ- खडकमाळ आळी) ५५ बूथ, प्रभाग क्रमांक १९ (लोहियानगर कासेवाडी) येथे २२ बूथ आणि प्रभाग क्रमांक २९ (नवी पेठ-दत्तवाडी) ३६ बूथ आहेत. या पोटनिवडणुकीत एकूण १ लाख ३८ हजार ४०३ जणांनी मतदानाचा हक्क बजावला. पण प्रभाग क्रमांक १५ मध्ये २०१९ च्या तुलनेत ४ हजार ४५० मतदारांनी पाठ फिरवल्याने तेथील मतदानाचा टक्का पाच टक्क्यांनी घसरला. त्यामुळे त्याचा फटका कोणाला बसणार याकडे लक्ष लागले होते. मतमोजणीनंतर याचा थेट फटका भाजपलाच बसल्याचे स्पष्ट झाले आहे.
२०१९ च्या विधानसभा निवडणुकीत भाजपला प्रभाग क्रमांक १५ मध्ये २१ हजार २९ मतांची आघाडी होती. या पोटनिवडणुकीत तेथे फक्त ७ हजार २७६ मतांची आघाडी मिळाली. पूर्वी या भागात काँग्रेसला ज्या बुथवर ५० मतही मिळत नव्हते तेथे आता सर्वच ठिकाणी १०० पेक्षा जास्त मतदान मिळाले आहे. प्रभाग क्रमांक १६ हा काँग्रेस उमेदवार रवींद्र धंगेकर यांना त्यांच्या हक्काच्या प्रभागात ४ हजार ४६० ची आघाडी मिळाली. प्रभाग १७ मध्ये ६ हजार ३०५, प्रभाग १८ मध्ये ३ हजार ९४३, प्रभाग क्रमांक १९ मध्ये १हजार ५७४ आणि प्रभाग क्रमांक २९ मध्ये १हजार ५९७ चे मताधिक्य मिळाले आहे. २०१९ च्या निवडणुकीत भाजपला प्रभाग १५ व २९ मध्येही मताधिक्य होते. यावेळी केवळ १५ मध्येच मताधिक्य आहे.
प्रभाग निहाय उमेदवारांची मत ( पोस्टल मतदानाचा यात समावेश नाही)
प्रभाग क्रमांक हेमंत रासने रवींद्र धंगेकर मताधिक्य
१५ - २१६८३ - १४४२७ - ७२५६ (भाजप)
१६ -६०३३ - १०४९३ - ४४६०(काँग्रेस)
१७ - १०५२१ - १६८२६ - ६३०५ (काँग्रेस)
१८ - ११०३५ - १४९७८ - ३९४३ (काँग्रेस)
१९ - ४४२० - ५९९४ - १५७४ (काँग्रेस)
२९ - ८४७८ - १००७५ - १५९४ (काँग्रेस)