सदाशिव, नारायण कोणाला तारणार? | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Ravindra Dhangekar and Hemant Rasane

कसबा विधानसभा मतदारसंघाच्या पोटनिवडणुकीत ५०.०६ टक्के मतदान झाले. पोटनिवडणूक असतानाही राजकीय पक्षांच्या अपेक्षेपेक्षा जवळपास १० टक्के जास्त मतदान झाले आहे.

Kasaba Vidhansabha Byelection : सदाशिव, नारायण कोणाला तारणार?

पुणे - कसबा विधानसभा मतदारसंघाची पोटनिवडणूक चुरशीची होत असताना या मतदारसंघांतील सहा प्रभागांपैकी पाच प्रभागांमधील मतदानाच्या टक्केवारीत २०१९ च्या तुलनेत जास्त बदल झालेला नाही. पण सदाशिव, नारायण, शनिवार पेठेचा समावेश असलेल्या प्रभाग क्रमांक १५ मध्ये भाजपला २१ हजाराने मताधिक्य मिळवून दिले होते. तेथे यावेळी साडेचार हजाराने (पाच टक्क) कमी मतदान झाल्याने तो निवडणुकीच्या निकालात निर्णायक ठरण्याची शक्यता आहे.

कसबा विधानसभा मतदारसंघाच्या पोटनिवडणुकीत ५०.०६ टक्के मतदान झाले. पोटनिवडणूक असतानाही राजकीय पक्षांच्या अपेक्षेपेक्षा जवळपास १० टक्के जास्त मतदान झाले आहे. या निवडणुकीतील आक्रमक प्रचार, मतदारसंघातील प्रश्‍न, हिंदुत्व यासारखे मुद्दे चर्चेत येत असताना मतदारांची मानसिकताही त्या नुसार बदलत गेली. ही लढत अवघड होणार असल्याचे स्पष्ट होताच भाजप व काँग्रेसने त्यांचा हक्काचा मतदार बाहेर काढण्यासाठी प्रयत्न सुरू केले. त्याला बऱ्यापैकी यश आलेले दिसून येत आहे. रविवारी (ता. २६) मतदानाची प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर राजकीय पक्षाचे कार्यकर्ते, पदाधिकारी बुथनिहाय विश्लेषण करत आहेत. त्यामध्ये काँग्रेस आणि भाजप या दोन्ही पक्षांकडून आम्ही किमान ५ ते ७ हजार मतांनी निवडून येऊ असा दावा करत आहेत.

निवडणूक आयोगाने मतदारयाद्या अद्ययावत करताना २०१९ मधील १५ हजार नावे यादीतून वगळली. त्याचा परिणाम कोणत्या पक्षावर होणार याचीही चर्चा सुरू होती. पण पोटनिवडणुकीत मतदान होताना प्रभाग क्रमांक १५ मध्ये पाच टक्के कमी मतदान झाले आहे. तर १६,१७, १८, १९ आणि २९ या प्रभागात मतदानाच्या टक्केवरीत अर्धा ते दोन टक्के फरक पडलेला आहे. कसब्यात सर्वाधिक मतदार हे प्रभाग १५ मध्ये आहेत आणि तेथेच मागील विधानसभेला ४१हजार ७७७ (५७ टक्के ) मतदान होऊन त्यापैकी सुमारे ६८ टक्के मत भाजप मिळून २१ हजार २९ मतांचे मताधिक्य शनिवार, सदाशिव, नारायण, शुक्रवार पेठने दिले होते. यंदा या प्रभागात ५१.८९ टक्के म्हणजे ३७ हजार २३७ टक्के मतदान झाले आहे. गेल्यावेळेच्या तुलनेत ४ हजार ५४० मतदान कमी झालेले असल्याचे आकडेवारीवरून स्पष्ट झालेले आहे. तसेच यंदा नोटा या पर्यायाची चर्चा निवडणुकीत झाली होती, त्यामुळे ३७ हजार २३७ पैकी किती मत कोणाच्या पारड्यात जातात याकडे लक्ष लागलेले आहे.

विधानसभा २०१९ (आकड्यांमध्ये काही प्रमाणात बदल होऊ शकतो)

प्रभाग - एकूण मतदान - झालेले मतदान - टक्के

प्रभाग क्रमांक १५ - ७२४८० - ४१७७७ - ५७

प्रभाग क्रमांक १६ - २९३३६ - १५९१८ - ५४.२६

प्रभाग क्रमांक १७ -६१३२५ - २९५२७ - ४७.७६

प्रभाग क्रमांक १८ - ६१०४९ - २९३४१ - ४८.०४

प्रभाग क्रमांक १९ - २४७८३ - ११३८७ - ४५

प्रभाग क्रमांक २९ -४१७९७ -२२१०९ - ५२.६४

एकूण - २९०७७० - १,५०,०५७ - ५१.६४

विधानसभा २०२३

प्रभाग - एकूण मतदान - झालेले मतदान - टक्के

प्रभाग क्रमांक १५ - ७१७५६ - ३७२३७ - ५१.८९

प्रभाग क्रमांक १६ -३०१२८ - १६९९९ - ५६.४२

प्रभाग क्रमांक १७ - ५५९५० - २७६५३ - ४९.४२

प्रभाग क्रमांक १८ - ५६१८५ - २६६०० - ४७.३४

प्रभाग क्रमांक १९ -२२९७९ -१०६१३ -४६.१६

प्रभाग क्रमांक २९ - ३८०५० - १९०५३ - ५०.१२

एकूण -२,७५,६७९ - १३८०१९ -५०.०६