Pune : निवडणूक सहानुभूतीवर नाही तर विकासावर लढवा ; अजित पवार Pune Kasba and Chinchwad constituencies elections Ajit Pawar | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

 Ajit Pawar

Pune : निवडणूक सहानुभूतीवर नाही तर विकासावर लढवा ; अजित पवार

पुणे : कसबा आणि चिंचवड या दोन्ही मतदार संघाची पोटनिवडणूक सहानुभूतीवर नाही तर विकासाच्या मुद्द्यावर लढवायची आहे. कमळाबाई काही करू शकते, कोणत्याही अफवांवर विश्‍वास न ठेवता व प्रलोभनांना बळी न पडता प्रामाणिकपणे काम करावा, तसेच पुण्यातील पदाधिकाऱ्यांनी चिंचवडला येऊन कसब्याकडे दुर्लक्ष करू नका असा सल्ला विरोधीपक्षनेते अजित पवार यांनी राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांना दिला.

राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या कार्यकारिणीची बैठक पुण्यात झाली. त्यात ते पवार बोलत होते. शहराध्यक्ष प्रशांत जगताप, आमदार चेतन तुपे, सुनील टिंगरे, माजी आमदार जयदेव गायकवाड, कमल ढोले पाटील, प्रदीप गारटकर, अजित गव्हाणे, अंकुश काकडे आदी उपस्थित होते.

पवार म्हणाले, ‘‘ शिंदे-फडणवीस सरकारला निवडणूक आयोग, न्यायालयाने कोणतीही मान्यता न दिल्यामुळे हे सरकार घटनाबाह्यच आहे. त्यांच्या विरोधात नाराजी असल्याने विधान परिषदेच्या निवडणुकीत त्यांचा पराभव झाला.

आता चिंचवड व कसबा या दोन्ही मतदार संघाच्या निवडणुकांमध्ये या गद्दार सरकारला त्यांची जागा दाखवून द्या. ही निवडणूक आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांच्या तयारीच्या दृष्टीने महत्त्वाची ठरणार आहे. कमळाबाई' काहीही करुण शकते त्यामुळे महाविकास आघाडीच्या कार्यकर्त्यांनी ही निवडणूक गांभीर्याने घ्यावी. विजय मिळविण्यासाठी कुठेही कमी पडू नका, असे पवार यांनी सांगितले.

नागरिकांशी साहेबांसारखे बोला

पोटनिवडणुकीत नागरिकांशी बोलताना माझ्या सारखे कडक भाषेत बोलू नका, शरद पवार साहेब कसे समजून सांगतात याप्रमाणे बोला, मतदार नाराज होणार नाही याची दक्षताही बाळगावी, असे सांगताच कार्यकर्त्यांमध्ये हास्याचे फवारे उडाले. तसेच महाविकास आघाडीच्या मतांची विभागणी होवू देवू नका, असेही पवार सांगितले.