
'मेलेल्यांनाही मतदानाला हजर करा'..'त्या'क्लिपवर भाजप प्रवक्त्यांचा आक्षेप
पुणे - कसबा विधानसभा मतदारसंघाच्या पोटनिवडणुकीचा प्रचार शेवटच्या टप्प्याकडे जात असताना या निवडणुकीतल्या दोन्ही पक्षांकडून एकमेकांना लक्ष्य केले जात आहे. या निवडणुकीत महाविकास आघाडीचे उमेदवार रविंद्र धंगेकर यांच्यासाठीच्या प्रचारसभेतील एक क्लिप व्हायरल झाली असून त्यावर भाजपचे प्रवक्ते केशव उपाध्ये यांनी आक्षेप व्यक्त केला आहे. (Pune Kasba Bypoll BJP Keshav Uhadhye objection over congress leaders remarks)
या निवडणुकीत भाजपचे (BJP) हेमंत रासने विरुद्ध महाविकास आघाडीचे (Mahavikas Aghadi) रविंद्र धंगेकर असा थेट सामना आहे.दोन्ही बाजूंनी पक्षाच्या मान्यवर नेत्यांना प्रचारात उतरवलं जात आहे.एकूणच रॅली, प्रचार सभा, बैठका आणि मेळाव्यांमुळं इथलं वातावरण तापलं आहे.त्यातच काल झालेल्या एका मेळाव्यातली एका नेत्याच्या भाषणाची क्लिप व्हायरल होत आहे.
काल पुण्यात महाविकास आघाडीचे उमेदवार रविंद्र धंगेकर यांच्या प्रचारासाठी राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार (Sharad Pawar) यांच्या उपस्थितीत अल्पसंख्याकांचा मेळावा आयोजित करण्यात आला होता.त्या मेळाव्यात भाषण करताना काँग्रेसचे माजी नगरसेवक उस्मान हिरोली यांनी केलेल्या भाषणाचा व्हिडिओ व्हायरल होत आहे.
"२६ तारखेला मतदान आहे.आपले लोक दुबई किंवा सौदीला गेलेले असतील त्यांना हजर करा.एवढंच नाही तर मेलेल्यांनाही हजर करा, तेव्हाच हे युद्ध जिंकता येईल", असे वक्तव्य त्यांनी मेळाव्यात केल्याची जोरदार चर्चा सोशल मिडियावर होते आहे.
भाजपचे प्रवक्ते केशव उपाध्ये यांनी हा व्हिडीओ ट्विट केला आहे "मोदी आणि संघाला पराभूत करण्यासाठी दुबईवरुन लोक आणा, सौदीवरून लोक आणा, मेलेले आहेत त्यांना हजर करा, ही विधान आहेत शरद पवार यांच्या उपस्थितीत झालेल्या अल्पसंख्याक बैठकीत काँग्रेसचे माजी नगरसेवक उस्मान हिरोली यांचे. बोगस मतदान घडविण्याची योजना पणे आखली जात आहे."असं म्हणत त्यांनी निवडणूक आयोगाला या प्रकारणाची दखल घेण्याची विनंती केली आहे.