काश्मीरमधील मुलींची ‘सकाळ’ला भेट | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Sakal-Pune-Office

‘मी नाशिकमध्ये होमिओपॅथीचे शिक्षण घेऊन आता डॉक्टर झाली आहे. पण माझ्या ज्ञानाचा उपयोग काश्मीरमधील लोकांसाठी करायचा आहे.

Kashmir Girls : काश्मीरमधील मुलींची ‘सकाळ’ला भेट

पुणे - ‘मी नाशिकमध्ये होमिओपॅथीचे शिक्षण घेऊन आता डॉक्टर झाली आहे. पण माझ्या ज्ञानाचा उपयोग काश्मीरमधील लोकांसाठी करायचा आहे. तिथल्या लोकांना आरोग्यदायी जीवनशैलीसाठी मार्गदर्शन करायचे आहे, कारण त्यांना गरज आहे’, असे सांगत होती डॉ. सरवर जान. ‘काश्मीर ते कन्याकुमारी असा विलक्षण प्रवास केला तो बॉर्डरलेस वर्ल्ड फाऊंडेशनमुळे. आत्ता अभियांत्रिकीचे शिक्षण घेत आहे. भविष्यात फाऊंडेशनसह काम करून या ऋणांची परतफेड करायची आहे’, हे उद्गार होते गुलशन आरा या तरुणीचे.

काश्मीरनिवासी असलेल्या आणि दहशतवादी हल्ल्यांत पालक गमावलेल्या तरुणींनी हे अनुभव मांडले. निमित्त होते, बॉर्डरलेस वर्ल्ड फाऊंडेशनतर्फे आयोजित या मुलींच्या महाराष्ट्र दौऱ्याचे. या दौऱ्यांतर्गत सुमारे चाळीस मुलींनी सोमवारी ‘सकाळ’ कार्यालयाला भेट देत आपले अनुभव सांगितले. तसेच, कार्यालयातील विविध विभागांना भेट देत वृत्तपत्राचे कामकाज समजून घेतले. याप्रसंगी फाउंडेशनचे संस्थापक अधिक कदम तसेच ॲड. नरसिंग लगड, प्रकाश गोरे, वीरेंद्र शहा आदी उपस्थित होते.

हे फाउंडेशन जम्मू-काश्मीरमध्ये युद्धाची व दहशतवादी हल्ल्यांची झळ बसलेल्या मुलांच्या सामाजिक-शैक्षणिक उत्थानासाठी काम करते. या मुलांना दरवर्षी विविध राज्यांची सफर घडवली जाते. यंदा चाळीस मुलींना महाराष्ट्रातील शहरांच्या भेटीवर आणले आहे. कोल्हापूर, नारायणगाव आदी गावांना भेट दिल्यानंतर या मुली पुण्यात आल्या होत्या. शनिवारवाड्यासह पुण्यातील विविध स्थळांची सैर आनंददायी होती, असा अनुभव या मुलींनी सांगितला.

काश्मीरमधील अनाथ मुलींना तसेच मुलांना सर्वतोपरी मदत करण्यासाठी आम्ही काम करतो. ही मुले-मुली लहान वयातच काश्मीरमधून बाहेर पडल्यास त्यांची मातृभूमीशी असलेली नाळ तुटते आणि त्यांना काश्मीरबद्दल आत्मीयता राहत नाही. त्यामुळे त्यांचे बारावीपर्यंतचे शिक्षण काश्मीरमध्येच पूर्ण होईल, यासाठी आम्ही प्रयत्न करतो.

- अधिक कदम, संस्थापक - बॉर्डरलेस वर्ल्ड फाऊंडेशन