गुलाल आपणच उधळणार...! 

संभाजी पाटील 
सोमवार, 6 फेब्रुवारी 2017

होय ! गुलाल उधळण्याची तयारी सुरू झालीय. पक्षाची अधिकृत उमेदवारी मिळवणे ही अर्धी लढाई जिंकण्यासारखेच असते. शेवटच्या क्षणापर्यंत इच्छुकांना झुलवत ठेवत सर्वच राजकीय पक्षांनी शेवटच्या क्षणी उमेदवारी जाहीर केली. काही पक्षांनी तर हातात दिलेले "एबी' फॉर्म परत घेत दुसऱ्याला देऊन इच्छुकाच्या नशिबाची थट्टा केली. त्यामुळे शुक्रवारचा दिवस अनेकार्थांनी नाट्यमय घडामोडींचा ठरला. यातील प्रत्येक क्षण इच्छुकांनी आणि आता अधिकृत उमेदवार झालेल्यांनी सोशल मीडियावर "एन्जॉय' केला. स. प. महाविद्यालयाच्या परिसरातील भाऊने तिकीट जाहीर होताच फेसबुकवर गुलाल आपणच उधळणार, असे जाहीर करून टाकले.

होय ! गुलाल उधळण्याची तयारी सुरू झालीय. पक्षाची अधिकृत उमेदवारी मिळवणे ही अर्धी लढाई जिंकण्यासारखेच असते. शेवटच्या क्षणापर्यंत इच्छुकांना झुलवत ठेवत सर्वच राजकीय पक्षांनी शेवटच्या क्षणी उमेदवारी जाहीर केली. काही पक्षांनी तर हातात दिलेले "एबी' फॉर्म परत घेत दुसऱ्याला देऊन इच्छुकाच्या नशिबाची थट्टा केली. त्यामुळे शुक्रवारचा दिवस अनेकार्थांनी नाट्यमय घडामोडींचा ठरला. यातील प्रत्येक क्षण इच्छुकांनी आणि आता अधिकृत उमेदवार झालेल्यांनी सोशल मीडियावर "एन्जॉय' केला. स. प. महाविद्यालयाच्या परिसरातील भाऊने तिकीट जाहीर होताच फेसबुकवर गुलाल आपणच उधळणार, असे जाहीर करून टाकले. जाता जाता त्यांनी "हाती चले बाजार, कुत्ते भोके हजार...' असा पक्षांतर आणि इतर विरोधकांना चिमटाही काढला. 
तिकडे कात्रजच्या तात्यांची हवा भारीच. तात्या आणि माई (सौ. तात्या) यांनी वेगवेगळ्या प्रभागांत खास "दिलसे' स्टाइल अर्ज दाखल करत विरोधकांना सोशल मीडियावर आव्हान दिले. "वेढा पडला गद्दारांचा, एकच आवाज तात्याचा' असे म्हणत दोन्ही प्रभाग काढणारच, असा आत्मविश्‍वास व्यक्त केलाय. तळजाईच्या "साहेबांनी' "पत्ते जरी 52 असले तरी पिसणारा एकच असतो.. आणि एक्के चार असले तरी जिंकणारा एकच असतो..' असा आवाज टाकत प्रभागात आपले आणि आपलेच वर्चस्व असल्याचे म्हटले आहे. अलका टॉकीज चौकातील युवा नेत्याला नदीपल्याड तिकीट दिले तरी तो खूष आहे, "एबी' फॉर्म हातात घेऊन त्यांनी सकाळी- सकाळी आपला फोटो अपलोड केलाय. त्यावर समर्थकांनी "नगरसेवक होणारच' अशा झकास शुभेच्छाही दिल्या. मार्केट यार्ड परिसरात युवतींचे नेतृत्व करणाऱ्या ताईंनी दुसऱ्यांदा अर्ज दाखल करताना या वेळी चुकायचं नाही असा आत्मविश्‍वास व्यक्त केलाय.

"माणूस आपला असा पाहिजे, पैशांनी श्रीमंत नसला तरी चालेल; पण मनाने आणि त्याच्या सामाजिक कार्याने मोठा असला पाहिजे, आपल्या स्थानिकांच्या कायम सेवेला असला पाहिजे,' असे आवाहन त्यांनी करून प्रचाराला सुरवात केल्याचे जाहीर केले आहे. अनेक उमेदवारांनी आपले स्वतंत्र फेसबुक पेज तयार करून त्यावर वेगवेगळ्या पद्धतीने "गुलाल आपणच उधळणार' हे आवर्जून सांगितलंय. बघू आता कोण काय उधळतयं ते.

Web Title: pune khabarbat social medial