Pune : शर्यत बैलगाड्याची निशाणा मात्र विधानसभेवर

खेड-आळंदी विधानसभा मतदारसंघात देखील अशीच निवडणुकीची तयारी सुरू असल्याचे चित्र आहे.
 शर्यत बैलगाडा
शर्यत बैलगाडाsakal

आंबेठाण : राज्यात विधानसभा निवडणुकीला जरी अजून एक वर्ष बाकी असले तरी निवडणूकपूर्व धामधूम आताच सुरू झाली आहे.जशी परिस्थिती राज्यात आहे तसाच प्रकार प्रत्येक तालुक्याच्या राजकीय क्षेत्रात सुरू आहे.

मग याला खेड तालुका तरी अपवाद कसा असेल?. खेड-आळंदी विधानसभा मतदारसंघात देखील अशीच निवडणुकीची तयारी सुरू असल्याचे चित्र आहे. तालुक्यात बैलगाडा स्पर्धेच्या निमित्ताने निवडणुकीचे पडघम वाजायला सुरुवात झाली आहे. खेडमध्ये शर्यत जरी बैलगाड्याची असली तरी त्याला किनार मात्र विधानसभा निवडणुकीची असल्याचे जाणवत आहे.बैलगाड्याच्या घाटातून निशाणा विधानसभेवर ठेवण्यात आला आहे.

बैलगाडा शर्यतीला सशर्त परवानगी मिळाल्यापासून शेतकरी आणि गाडा शौकीनांमध्ये उत्साहाचे वातावरण आहे. गावागावात बैलगाड्याच्या घाटात धुरळा उडत आहे.पुढील काळात येऊ घातलेल्या निवडणुका लक्षात घेता अनेकांनी बैलगाडाप्रती लोकांना असलेली आवड लक्षात घेता त्यांना गोंजारण्याचे काम सुरू केले आहे.

आजवर आपण कुस्ती स्पर्धेत महाराष्ट्र केसरी स्पर्धा पाहिली, त्यांनतर आता महिलांची महाराष्ट्र केसरी कुस्ती स्पर्धा पहिली पण आता तर खेडमध्ये पंचायत समिती आणि बाजार समितीचे माजी सभापती रामदास ठाकूर यांनी तर बैलगाड्यांची महाराष्ट्र केसरी शर्यत ठेवली आहे.

जरी त्यांच्याकडून आयोजन बैलगाडा स्पर्धेचे केले असले तरी या माध्यमातून त्यांची विधानसभेच्या रिंगणात पुन्हा एकदा उतरण्याची इच्छा लपून राहिलेली नाही.खेड तालुक्यासह आजूबाजूच्या तालुक्यात आणि शहरी भागात या शर्यतीच्या करण्यात आलेल्या जाहिरातीत रामदास ठाकूर आणि शेजारी विधानभवनाचे चित्र छापण्यात आले आहे. त्यामुळे यातून आमदार होण्याची त्यांची इच्छा स्पष्टपणे दिसत आहे.

रामदास ठाकूर यांनी यापूर्वी २००९ साली विधानसभा लढविली होती. त्यात त्यांना अपयश आले असले तरी अपक्ष असूनही त्यांनी ४० हजारांपेक्षा जास्त मतदान घेतले होते.यावेळी होणाऱ्या बैलगाडा शर्यतीला अजित पवार,जयंत पाटील,दिलीप वळसे पाटील, नरहरी झिरवळ, धनंजय मुंडे यांच्यासह जिल्ह्यातील आमदार आणि खासदार उपस्थित राहणार असल्याचे सांगितले जात आहे.

खेडमध्ये मागील विधानसभा निवडणुकीच्या वेळी दिलीप मोहितेपाटील यांनी ही माझी शेवटची निवडणूक असेल असे सांगितले होते.मोहिते यांच्या या घोषणेने स्वपक्षातील त्यांच्या नेत्यांसह विरोधकांना थोडेसे का होईना हायसे वाटले असेल. त्यामुळे येणाऱ्या निवडणुकीत राष्ट्रवादीत आमदारकीसाठी इच्छुक असणाऱ्या अनेकांच्या विधानसभा लढण्याच्या आशा पल्लवित झाल्या आहेत.त्यातूनच ठाकूर यांची इच्छा प्रकट झालेली दिसत आहे.

सध्या तालुक्यात आमदार मोहिते यांचा सुरू असणारा कामाचा धडाका आणि वेगवेगळ्या निवडणूकित मिळत असलेले यश पाहता मोहिते यांचे कार्यकर्ते त्यांना निवडणूक लढविण्यापासून थांबवतील असे चित्र दिसत नाही. त्यामुळे पुढील काळात खेडचा आमदार होण्यासाठी सुरू असलेली स्पर्धा केवळ तालुक्यातच नाही तर राष्ट्रवादीत देखील पहायला मिळेल यात शंका नाही.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com