आठवड्यानंतर पुणे-कोल्हापूर एसटी सेवा सुरू

सकाळ वृत्तसेवा
मंगळवार, 13 ऑगस्ट 2019

कोल्हापूर आणि सांगली येथील पूरपरिस्थितीमुळे पुणे-बेंगळुरू राष्ट्रीय महामार्गासह अनेक रस्ते पाण्याखाली गेले होते. परिणामी, या दोन शहरांना अन्य भागाशी संपर्क तुटला होता. मागील दोन दिवसापासून पुराचे पाणी कमी होण्यास सुरवात झाली असून सोमवारी सांयकाळी पुणे-बेंगळुरू महामार्ग सुरू करण्यात आला होता.

पुणे : आठवडाभरापेक्षा जास्त काळापासून पुरामुळे बंद असलेली पुणे-कोल्हापूर एसटी सेवा मंगळवारपासून (ता.13) सुरू करण्यात आली आहे. कोल्हापूरमध्ये काही भागात पाणी असल्याने शिवाजी विद्यापीठ मार्गे या गाड्या सोडल्या जात आहेत. दरम्यान, सांगलीच्या परिसरातील रस्ता पाण्याखाली असल्याने पुणे-सांगली एसटी सेवा सुरू अद्याप होऊ शकलेली नाही.

कोल्हापूर आणि सांगली येथील पूरपरिस्थितीमुळे पुणे-बेंगळुरू राष्ट्रीय महामार्गासह अनेक रस्ते पाण्याखाली गेले होते. परिणामी, या दोन शहरांना अन्य भागाशी संपर्क तुटला होता. मागील दोन दिवसापासून पुराचे पाणी कमी होण्यास सुरवात झाली असून सोमवारी सांयकाळी पुणे-बेंगळुरू महामार्ग सुरू करण्यात आला होता. त्यामुळे मंगळवारपासून एसटी प्रशासनाने पुणे ते कोल्हापूर सेवा सुरू केली आहे. कोल्हापूर शहरात काही भागात पाणी असल्याने एसटीच्या गाड्या शिवाजी विद्यापीठ मार्गे ये-जा करत आहेत. परंतु, पुणे-सांगली एसटी सेवा पाण्यामुळे मंगळवारीही सुरू होऊ शकली नाही. 

याबाबत स्वारगेट आगाराचे आगारप्रमुख प्रदीपकुमार कांबळे म्हणाले, "मंगळवारी सकाळपासून पुणे ते कोल्हापूर दरम्यानची वाहतूक सुरू केली असून प्रवाशांच्या गर्दीनुसार गाड्या सोडण्यात येत आहेत. या गाड्यांची संख्या हळूहळू वाढविण्यात येईल.'' तसेच सांगली शहरातील पाणी कमी झाल्यावर एसटी सेवा सुरू करण्यात येणार असल्याचेही त्यांनी सांगितले.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Pune Kolhapur ST service starts again