Pune News: ओशो अनुयायांत आरोप-प्रत्यारोप Pune Koregaon Park Osho Ashram Accusations and counter | Latest Marathi News | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

protest against osho ashram administration pune

Pune News: ओशो अनुयायांत आरोप-प्रत्यारोप

Pune News:: कोरेगाव पार्क येथील ओशो आश्रमात ओशो संबोधी दिन मंगळवारी उत्साहात साजरा करण्यात आला. यावेळी विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते.

त्याला मोठ्या संख्येने अनुयायांनी हजेरी लावली. दरम्यान, कार्यक्रमादरम्यान अनुयायांच्या दोन गटांत आरोप-प्रत्यारोप झाले. (Latest Pune News)

ओशो संबोधी दिनानिमित्त आचार्य रजनीश यांच्या शिष्य परिवारातर्फे आयोजित करण्यात आलेल्या कार्यक्रमांमध्ये सोमवारी सायंकाळी संगीतासह ध्यान व सत्संग कार्यक्रम झाला.

तसेच मंगळवारी २१ रोजी संबोधी दिनानिमित्त सकाळी साडे अकरापासूनच ओशो समाधी दर्शन व ज्ञान धरण्यासाठी ओशो आश्रमाजवळ अनुयायी माळा घालून जमा झाले होते.

त्यामुळे आश्रमातर्फे दोन्ही बाजूला व मुख्य प्रवेशद्वारावर मोठ्या प्रमाणात पोलिस बंदोबस्त तैनात करण्यात आला होता. आश्रमाच्या प्रवेशद्वारावर ओशो अनुयायांमध्ये दोन गट होते. त्यांच्यात आरोप-प्रत्यारोप होत होते. त्यामुळे पोलिसांनी रात्रीपर्यंत कडक बंदोबस्त तैनात केला होता.

दरम्यान, ओशो आश्रमात रजनीश यांचे राष्ट्रीय स्मारक उभारावे, यासाठी बहुजन समाज पार्टीतर्फे आश्रमाच्या मुख्य प्रवेशद्वाराजवळ माजी नगरसेवक डॉ. हुलगेश चलवादी, सुदीप गायकवाड, पार्टीचे पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी मोर्चा आणला होता.

पक्षातर्फे ओशो समाधीचे सर्वांना मोफत दर्शन मिळावे, यासाठी धर्मदाय आयुक्तांना निवेदन देण्यात आले.

ओशोंचे ध्येय होते की कोणीही शिष्य येऊन मोफत ध्यान करेल. त्यावेळी ओशोंनी एक समिती तयार केली. त्यात आता पाच लोक उरले आहेत. ते मनमानी करत आहेत.

— अनिल गुप्ता, अनुयायी

ओशो आश्रमात माळा घालून येऊ नये, असे आदेश काढले आहेत. प्रवेशासाठी ९७० रुपये शुल्क आकारले जाते. आश्रमात गैरप्रकार सुरू आहेत.

— रतन स्वामी, अनुयायी

ओशो म्हणजे विचार आहेत. त्याचा धार्मिकतेशी काहीही संबंध नाही. ओशोंनी दिलेल्या विचारांनुसारच आश्रमाचे कामकाज सुरू आहेत. आश्रमाच्या देखभाल दुरुस्तीसाठी प्रवेश शुल्क ४० वर्षांपासून आकारले जाते. सार्वजनिक ठिकाणी माळा घालू नका, असे भगवान ओशोंनीच सांगितले आहेत. त्याचे व्हिडिओ उपलब्ध आहेत. काही लोक आश्रमाबद्दल जाणीवपूर्वक अपप्रचार करून संभ्रम निर्माण करण्याचा प्रयत्न करीत आहेत.

— मॉ अमृत साधना,ओशो आश्रम व्यवस्थापन समिती सदस्या

टॅग्स :Pune NewspuneSakal