पुण्यात बिबट्याचा पुजाऱ्यावर हल्ला; नाक, ओठांचे तोडले लचके

पुण्यात बिबट्याचा पुजाऱ्यावर हल्ला; नाक, ओठांचे तोडले लचके

खडकवासला (पुणे) : पानशेत रस्त्यावर ओसाडे गावाजवळ बिबट्याने छबन महादेव जोरकर (वय 66) यांच्यावर बुधवारी रात्री हल्ला केला. या हल्ल्यात जोरकर गंभीर जखमी झाले. जोरकर हे शिवकालीन श्रीओसाडजाई मंदिराचे पुजारी आहेत. ते मंदिराच्या शेजारी राहत असून, मंदिरालगत ओसरीवर रात्री झोपले असताना हा हल्ला झाला. 

पुणे पानशेत रस्त्यालगत ओसाडे गावाच्या फाट्याजवळ उजव्या हाताला शिवकालीन श्रीओसाडजाई मंदिर आहे. मंदिरापासून धरणाचे पाणलोट क्षेत्र 300- 400 मीटरवर आहे. बुधवारी रात्री जोरकर मंदिराजवळ नेहमीप्रमाणे झोपले होते. ते शांत झोपलेले असताना बिबट्याने अचानक त्यांच्यावर हल्ला करत चेहऱ्यावर झडप मारली आणि नाक, ओठ याचा लचका तोडला. त्यामुळे त्यांनी आरडाओरडा केला. त्यांचा आवाज ऐकून घरात झोपलेल्या पत्नी बायडाबाई व मुलगा नाना घरातून धावत ओसरीवर आले. त्यावेळी जोरकर यांच्या अंथरूणाशेजारी बिबट्या दिसला.

बिबट्या गुरगुरत होता. त्याला पाहून नाना, बायडाबाई घाबरले. परंतु, प्रसंग लक्षात येताच दोघे माय-लेकरांन मदतीसाठी आरडाओरडा केला. त्यानंतर बिबट्या तेथून निघून गेला. लचका तोडल्यामुळे जोरकर यांच्या चेहरा रक्ताने माखला होता. त्यांना त्याच अवस्थेत खडकवासला येथील खासगी रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले. वनखात्याचे अधिकारी, कर्मचारी घटनास्थळी आले. 

दरम्यान, गुरुवारी सकाळी अकरा वाजण्याच्या सुमारास शेजारील निगडे मोसे येथील शेतात शेतकऱ्याला बिबट्या दिसला. मंदिर व शेत हे अंतर अर्धा एक किलोमीटर अंतरावर आहे. दोन्ही गावाच्या ओढ्यालगत शेतात पिकाला पाणी देत असलेल्या बबन बाबुराव नलावडे या शेतकर्‍यावर बिबट्याने धाव घेतली. मात्र, सुदैवाने ते शेतकरी यातून बचावले.

या घटनेची माहिती मिळताच वन विभागाचे अधिकारी कर्मचारी निगडे गावातील शेतात पोचले. दोन्ही घटनेची माहिती गावात पोचल्यावर ग्रामस्थ देखील तेथे आले. माणसांवर हल्ला केल्याने ग्रामस्थांनी बिबट्याला पकडण्याची मागणी केली. ग्रामस्थही लाठ्या-काठ्या घेऊन आले. दिवसभर ओढा व शेतात शोधकार्य सुरू होते. 

बिबट्याला पकडण्यासाठी वनखात्याने पथक तैनात केले. 
नसरापूर वनपरिक्षेत्र अधिकारी लांडगे, वनपाल एस. डी. भोकरे यांच्यासह अधिकारी, कर्मचारी सकाळपासून तैनात आहेत. कात्रज वन्य प्राणी अनाथालयातील रेस्क्यू पथक घटनास्थळी पोचले होते. परंतु त्यांना बिबट्या सापडला नाही. 

तीन दिवसांपूर्वी बिबट्या पिंजऱ्यात

पानशेत धरण परिसरात 10-15 दिवसांपासून बिबट्याचे वास्तव्य आहे. त्याने शेळ्या, बकऱ्यांवर हल्ला चढवला होता. त्यानुसार, वन विभागाने पानशेत धरणाजवळील कादवे गावाच्या शिर्केवाडी येथे तीन दिवसांपूर्वी लावलेल्या पिंजऱ्यात बिबट्या सापडला होता. दरम्यान, तो जखमी नव्हता. तसेच व्यवस्थित व सुदृढ असल्याने त्याला पुन्हा जंगलात सोडले. असे वन विभागाकडून सांगण्यात आले. 

सावधानता बाळगा

पानशेत रस्त्याने जाणारे नागरिक व या परिसरातील नागरिकांनी घाबरून जाऊ नये. स्थानिक रहिवाशांना सावधानता बाळगावी. पहाटे व संध्याकाळीच्या अंधारात लहान मुले, महिला यांनी एकटे घराबाहेर जाऊ नये. 

“ग्रामस्थांच्या माहितीनुसार आमचे कर्मचारी घटनास्थळी पोचले. घटनास्थळी कोणत्या हिंस्त्र वन्यजीवाचे पायाचे ठसे पूर्ण स्पष्ट दिसत नाहीत. परंतु बिबट्या सदृश्य प्राण्याने जोरकर यांच्यावर हल्ला केला आहे. हा प्राणी धरणातील पाणी पिण्यासाठी किंवा अन्नाचा शोधात तो ओसाडे येथे आला असावा.” असे वेल्हे तालुका वन परिक्षेत्र अधिकारी आय. जी. मुलाणी यांनी सांगितले. 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com