पुण्यात उद्योगांची गाडी रुळावर, काही ठिकाणी पेट्रोलच्या अडचणी 

Lockdown
Lockdown

पुणे - शहर, जिल्हा आणि पिंपरी चिंचवडमधील बहुतांश उद्योग लॉकडाउनच्या काळातही मंगळवारी सुरू राहिले. उद्योगांतील कामगारांना दुचाकींवरून कामावर जाण्यासाठी परवानगी मिळाली असली तरी, त्यांना पेट्रोल उपलब्ध होण्यात अडचण येत आहे. त्यासाठी उद्योग विभागाने जिल्हाधिकाऱयांशी संपर्क साधला आहे.

- पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

पुण्यात 23 जुलैपर्यंत दहा दिवसांचा लॉकडाउन आहे. या काळात उद्योग सुरू ठेवण्यासाठी जिल्हा प्रशासनाने परवानगी दिली आहे. विभागीय आयुक्त डॉ. दीपक म्हैसेकर, जिल्हाधिकारी नवल किशोर राम, पुणे महापालिकेचे आयुक्त विक्रम कुमार, पिंपरी चिंचवड़चे आयुक्त श्रावण हर्डिकर यांनीही त्यासाठी विविध आदेश काढले आहेत. 

शहर, पिंपरी चिंचवड आणि जिल्ह्यातील बहुतांश उद्योग मंगळवारी सुरू राहिले. मात्र, काही ठिकाणी कामगारांची संख्या 10- 15 टक्क्यांनी घटल्याचे दिसून आले. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर रजा घेणे किंवा घरीच थांबणे, हे त्या मागचे कारण आहे. उत्पादन क्षेत्राचे काम नियमितपणे सुरू होते. पिंपरी चिंचवड, भोसरी, तळेगाव, रांजणगाव, शिक्रापूर, सणसवाडी, चाकण, भोर, हिंजवडी, कात्रज, पिरंगुट आदी विविध ठिकाणचे उद्योग मंगळवारी सुरू होते. कामगारांची वाहतूक करण्यासाठी लहान मोठ्या बस, मोटारी हे पर्याय प्रशासनाने उपलब्ध करून दिले आहेत. तसेच आता दुचाकीवरूनही कामगारांना कामावर जाण्यासाठी परवानगी देण्यात आली आहे. त्यामुळेही उद्योगांना दिलासा मिळाला आहे. मात्र, दुचाकीवरून जाणाऱया कामगारांना  काही पंपांवर पेट्रोल उपलब्ध होत नसल्याच्या तक्रारी आहेत. त्यासाठी जिल्हा प्रशासनाशी संपर्क साधण्यात आला आहे. त्यानुसार ते आदेश काढतील, असे सूत्रांनी सांगितले. 

पुणे जिल्ह्यात शहर आणि पिंपरी चिंचवडसह सध्या सुमारे 70 हजार उद्योग सुरू आहेत. त्यात सुमारे 7 लाख कामगार काम करीत आहेत. माहिती तंत्रज्ञान (आयटी) क्षेत्रातील कंपन्यातही सुमारे 15 टक्के कर्मचारी प्रत्यक्ष ऑफिसमधून काम करीत आहेत तर, उर्वरित कर्मचारी वर्क फ्रॉम होम करीत आहेत. 

सदाशिव सुरवसे (उद्योग सहसंचालक, पुणे विभाग) - या लॉकडाउनच्या पहिल्या दिवशी पुणे, पिंपरी चिंचवड आणि जिल्ह्यातील बहुतांश उद्योग सुरू होते. काही ठिकाणी किरकोळ स्वरूपाच्या अडचणी आहेत. परंतु, त्यातून मार्ग काढण्यात येत आहेत. त्यासाठी उद्योग संचलनालय अहोरात्र कार्यरत आहे. 

प्रशांत गिरबाने (महासंचाल, मराठा चेंबर ऑफ कॉमर्स, इंडस्ट्रीज अँड ॲग्रीकल्चर) - उद्योग सुरळीत सुरू आहेत, ही चांगली बाब आहे. वरिष्ठ सनदी अधिकारी आणि पोलिस यांच्याकडून चांगले सहकार्य मिळत आहे. उद्योग आणि प्रशासन, यांच्यात समन्वय साधण्यासाठी परस्पर सहकार्यासाठी चेंबर कायमच तत्पर आहे. निर्णय जाहिर प्रशासनाने उद्योग, उद्योग संस्था यांच्याशी सातत्याने चर्चा केली, त्याचा खूप उपयोग झाला. 

Edited By - Prashant Patil

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com