Pune : लॉकडाऊन'ने हिरावला रोजगार, तो बनला दुचाकीचोर | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Crime

Pune : लॉकडाऊन'ने हिरावला रोजगार, तो बनला दुचाकीचोर

पुणे : "लॉकडाऊन'मध्ये हातचा रोजगार गेला, त्यानंतर पैसे कमाविण्यासाठी त्याने थेट वाहनचोरीचाच मार्ग निवडला. एवढेच नव्हे, तर ससून रुग्णालयात उपचार घेणाऱ्या नातेवाईकाला भेटण्यासाठी आल्यानंतर त्याने दुचाकी चोरीला सुरूवात केली. या चोरट्याला बंडगार्डन पोलिसांनी बेड्या ठोकल्या. त्याच्या ताब्यातुन 13 दुचाकी वाहने पोलिसांनी जप्त केली. न्यायालयाने त्यास दोन दिवसांची पोलिस कोठडी सुनावली आहे.

अख्तर चांद मुजावर (वय 44, रा.बनवडी, कोरेगाव, सातारा) असे अटक केलेल्या आरोपीचे नाव आहे. याप्रकरणी सैफन चांदसाब मुजावर (रा. बिबवेवाडी) यांनी वाहनचोरी प्रकरणी बंडगार्डन पोलिस ठाण्यात फिर्याद दिली होती. मुजावर यांचे नातेवाईक ससून रुग्णालयात उपचार घेत असल्याने ते त्यांना भेटण्यासाठी ऑगस्ट महिन्यात ससून रुग्णालयात गेले होते. त्यावेळी त्यांची दुचाकी चोरीस गेल्याप्रकरणी त्यांनी फिर्याद दिली होती. याच पद्धतीने ससूनसह अन्य रुग्णालयांच्या परिसरातुन दुचाकी वाहने चोरीस जाण्याच्या घटना घडल्या होत्या. त्याचा तपास करण्याच्या सुचना परिमंडळ दोनचे पोलिस उपायुक्त सागर पाटील यांनी दिल्या होत्या. त्यानुसार, पोलिस निरीक्षक (गुन्हे) अश्‍विनी सातपुते यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस उपनिरीक्षक राहुल पवार यांच्या पथकाने 200 हून अधिक सीसीटीव्ही चित्रीकरण तपासले.

हेही वाचा: 'त्रिपुरा'बाबत PM मोदींची घेणार भेट; दिल्ली दौऱ्यापूर्वी ममतांचा एल्गार

सीसीटीव्ही चित्रीकरणावरुन छायाचित्र तयार करुन ते विविध जिल्ह्यात पाठविले होते. त्यावेळी पोलिस कर्मचारी सुधीर घोटकुले, सागर घोरपडे यांना संबंधीत दुचाकीची चोरी मुजावर यानेच केल्याची माहिती मिळाली. त्यानुसार पोलिसांनी त्यास साताऱ्यातील बनवडी येथून अटक केली. त्याने हडपसर, स्वारगेट, निगडी व साताऱ्यातुन चोरलेल्या 13 दुचाकी जप्त केल्या. अख्तर मुजावर हा सेंट्रींगची कामे करीत होता. लॉकडाऊनमध्ये त्याचे काम गेले. त्यानंतर त्याने पैसे कमाविण्यासाठी दुचाकी चोरी करण्यास सुरूवात केली. पोलिस उपनिरीक्षक मोहन काळे, पोलिस कर्मचारी फिरोज शेख, हरिष मोरे, प्रताप गायकवाड, अनिल कुसाळकर, संजय वणवे, किरण तळेकर यांच्या पथकाने हि कारवाई केली.

"आरोपी अख्तर मुजावर हा ससूनमध्ये उपचार घेणाऱ्या नातेवाईकांना ऑगस्ट महिन्यात भेटण्यासाठी आला होता. त्यावेळी त्याने दुचाकी चोरीली. तेथून पुढे त्याने नियमीतपणे वाहनचोरी सुरू केली. चोरलेल्या दुचाकी विकण्याचा प्रयत्न केला. मात्र कागदपत्रे नसल्याने ग्रामीण भागातील त्याच्याकडील दुचाकी घेतल्या नाहीत.''

- सागर पाटील, पोलिस उपायुक्त, परिमंडळ 2.

loading image
go to top