बाबांचा हात पुण्याला लाभणार का? 

संभाजी पाटील
शनिवार, 12 मे 2018

कर्नाटक विधानसभेची निवडणूक आणि महाराष्ट्रातील लोकसभा-विधानसभेच्या पोटनिवडणुकांचे निकाल आगामी लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीसाठी जनमताचा कानोसा ठरेल. या निवडणुकांमुळे महाराष्ट्रातही राजकीय वातावरण तापले असून, लोकसभेच्या निवडणुकांसाठीची तयारी पक्षपातळीवर सुरू झाली आहे. राष्ट्रवादी कॉंग्रेसने लोकसभेची पुण्यातील जागा लढविणार असल्याचे जाहीर केल्याने कॉंग्रेस खडबडली आहे. काही झाले तरी पुण्यातील जागा सोडायची नाही, यावर स्थानिक पातळीवरील नेत्यांमध्ये एकमत झाले आणि चर्चा सुरू झाली ती लोकसभेच्या उमेदवाराची. पक्षाला पुण्यात तग धरायचा असेल, तर सर्वमान्य आणि तगडा उमेदवार असावा, या मागणीने जोर धरला आहे.

कर्नाटक विधानसभेची निवडणूक आणि महाराष्ट्रातील लोकसभा-विधानसभेच्या पोटनिवडणुकांचे निकाल आगामी लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीसाठी जनमताचा कानोसा ठरेल. या निवडणुकांमुळे महाराष्ट्रातही राजकीय वातावरण तापले असून, लोकसभेच्या निवडणुकांसाठीची तयारी पक्षपातळीवर सुरू झाली आहे. राष्ट्रवादी कॉंग्रेसने लोकसभेची पुण्यातील जागा लढविणार असल्याचे जाहीर केल्याने कॉंग्रेस खडबडली आहे. काही झाले तरी पुण्यातील जागा सोडायची नाही, यावर स्थानिक पातळीवरील नेत्यांमध्ये एकमत झाले आणि चर्चा सुरू झाली ती लोकसभेच्या उमेदवाराची. पक्षाला पुण्यात तग धरायचा असेल, तर सर्वमान्य आणि तगडा उमेदवार असावा, या मागणीने जोर धरला आहे. त्यातूनच माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण म्हणजेच बाबांचे नाव समोर आले आहे. राष्ट्रवादीला उत्तर देण्यासाठी कॉंग्रेसला अशा प्रकारचे पर्याय पुढील काळात समोर आणावे लागतील. 

लोकसभा-विधानसभा निवडणुकीसाठी दोन्ही कॉंग्रेसची आघाडी होईल, असे दोन्ही पक्षाचे नेते वारंवार सांगत आहेत. महाराष्ट्रातून आघाडीच्या जास्तीत जास्त जागा निवडून याव्यात, अशी राष्ट्रवादीची अपेक्षा आहे. पुण्यातील सध्याची राजकीय स्थिती पाहता लोकसभेची जागा जिंकून आणणे विरोधी पक्षांसाठी सोपे नाही. येत्या वर्षभरात त्यासाठी विरोधकांना मोठे कष्ट घ्यावे लागणार आहेत. आघाडीत जिल्ह्यात ज्या जागा आहे, त्यात पुण्याची एकमेव जागा कॉंग्रेसकडे आहे. पुण्यात कॉंग्रेसच्या कार्यकर्त्यांची मजबूत फळी आहे. सुमारे पावणे तीन-तीन लाखांचा पारंपरिक मतदारांचा पाया या पक्षाकडे आहे. मात्र, गेल्या पाच-सहा वर्षांमध्ये पक्षाला सातत्याने उतरती कळा लागली आहे, हे दुष्टचक्र भेदण्याची संधी लोकसभा निवडणुकीच्या निमित्ताने कार्यकर्त्यांना मिळणार आहे. पण त्यासाठी भाजपला तोड देईल असा उमेदवार द्या, ही कार्यकर्त्यांची मागणी पक्षश्रेष्ठी कशा पद्धतीने पूर्ण करणार यावर बऱ्याच गोष्टी अवलंबून आहेत. मागची लोकसभा लढविणारे युवक कॉंग्रेसचे प्रदेशाध्यक्ष विश्‍वजित कदम हे सांगली जिल्ह्यात विधानसभेची पोटनिवडणूक लढवीत आहेत. त्यांचा पुढील राजकीय प्रवास सांगली जिल्ह्यातच असेल असे दिसते. त्यामुळे पक्षाकडे उमेदवार कोण, या बाबत प्रश्‍नचिन्ह राहणार आहे. माजी आमदार मोहन जोशी यांनी या आधी लोकसभेची निवडणूक चांगल्या पद्धतीने लढविली आहे. सातत्याने पक्ष कार्यकर्त्यांच्या संपर्कात असणारा नेता अशी त्यांची प्रतिमा आहे. स्वत- जोशी निवडणुकीच्या दृष्टीने कामाला लागलेले दिसतात. इतर इच्छुकांमध्ये अद्याप मरगळ आहे. अशा परिस्थितीत माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी पुण्यात निवडणूक लढवावी, यासाठी प्रयत्न सुरू झाले आहेत. चव्हाण मुख्यमंत्री असताना त्यांनी पुण्यासाठी बराच वेळ दिला होता. शहराविषयीचे महत्त्वाचे निर्णयही त्यांच्या काळात झाले होते. सगळ्यात महत्त्वाचे वादग्रस्त नसलेले आणि पुणेकरांना अपेक्षित चेहरा या दृष्टीने चव्हाण यांच्याकडे पाहिले जात आहे. राष्ट्रवादीचा पुण्यातील शिरकाव रोखण्यासाठी चव्हाण नावाचे कार्ड किती प्रभावी ठरणार, हे लवकरच समजेल; पण कॉंग्रेसमध्ये जान भरेल, असे नाव पक्षाला हवे हे मात्र खरे. 

Web Title: pune Lok Sabha elections politics congress & NCP