esakal | पुण्याची लोकसभेची जागा राष्ट्रवादीची - अजित पवार

बोलून बातमी शोधा

Ajit-Pawar
पुण्याची लोकसभेची जागा राष्ट्रवादीची - अजित पवार
sakal_logo
By
सकाळवृत्तसेवा

पुणे - लोकसभा निवडणुकीसाठी पुण्याच्या जागेवर राष्ट्रवादी कॉंग्रेसचा हक्क असल्याचा पुनरुच्चार राष्ट्रवादी कॉंग्रेसचे नेते अजित पवार यांनी पक्षाच्या आढावा बैठकीत मंगळवारी केला.

राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षाचा वर्धापन दिन आणि हल्लाबोल आंदोलनाच्या पार्श्‍वभूमीवर पक्षाच्या प्रमुख कार्यकर्त्यांच्या बैठकीत त्यांनी हा पुनरुच्चार केला.

'आघाडीत जेथे ज्या पक्षाची ताकद जास्त त्या पक्षाला ती जागा मिळायला हवी. पुण्यात राष्ट्रवादी कॉंग्रेसची ताकद जास्त आहे, नगरसेवकांची संख्या चौपट आहे. ही वस्तुस्थिती असून, हा निकष सगळीकडे लावला जाईल,'' असे पवार म्हणाले.

विधान परिषद निवडणुकीत भाजप आणि राष्ट्रवादी कॉंग्रेसने एकमेकांना मदत केल्याच्या वृत्तांत तथ्य नसल्याचे सांगत त्यांनी आघाडीचा धर्म पाळल्याचे स्पष्ट केले. कर्नाटकचे माजी मुख्यमंत्री येडियुरप्पा यांचा मुख्यमंत्रिपदाच्या कालावधीचे रेकॉर्ड कोणीही तोडू शकणार नाही, अशी टीका करीत भाजपने कॉंग्रेस आणि जेडीएसचे आमदार फोडण्यासाठी पैशाचा वापर केला, त्यातून भाजपची मानसिकता लक्षात येते,'' असेही त्यांनी सांगितले.

"हल्लाबोल'च्या समारोपाला भुजबळ येणार
पक्षाच्या पश्‍चिम महाराष्ट्रातील हल्लाबोल यात्रेचा समारोप 10 जूनला पुण्यात सहकारनगर येथील शिंदे हायस्कूलच्या मैदानावर होणार आहे. या सभेला पक्षाचे ज्येष्ठ नेते छगन भुजबळ मार्गदर्शन करतील.

राष्ट्रीय अधिवेशन पुढे ढकलले
पुण्यात 10 जूनला होणारे पक्षाचे राष्ट्रीय अधिवेशन 23 आणि 24 जून रोजी होणार आहे.

बाबर यांच्या आरोपांची गंभीर दखल
राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या नगरसेविका अमृता बाबर यांनी केलेल्या आरोपांची पवार यांनी गंभीर दखल घेतली. अशा गोष्टी महापालिकेच्या सभागृहात बोलण्यापेक्षा प्रत्यक्ष बोलणे गरजेचे आहे. अन्याय होत असेल तर त्याची दखल पक्ष घेईल. पक्षनेतृत्वाला कमीपणा येईल, असे वक्तव्य करू नये; अन्यथा कडक कारवाई केली जाईल, असे पवार यांनी सांगितले. बाबर यांनी पक्षातील अंतर्गत कुरघोडीमुळे महिला व बालकल्याण समितीच्या सदस्यत्वाचा राजीनामा देत असल्याचे महापालिका सभागृहात सांगितले होते.