नवे कारभारी खर्चाला मंजुरी देणार?

सकाळ वृत्तसेवा
शुक्रवार, 7 एप्रिल 2017

पुणे - पुणे ते लोणावळा या दरम्यान उपनगरीय रेल्वे वाहतुकीसाठी तिसरा लोहमार्ग टाकण्याच्या कामाला कधी प्रारंभ होणार, याकडे रेल्वे प्रवाशांचे लक्ष लागले आहे. या मार्गासाठी ‘पीएमआरडीए’ने मान्यता देऊन या वर्षीच्या अर्थसंकल्पात तरतूददेखील केली आहे. या मार्गासाठी दोन्ही महापालिकांनीही निधीचा वाटा उचलणे अपेक्षित असून, नवे कारभारी या मार्गाच्या खर्चाला मंजुरी देणार का, यावरच या मार्गाच्या विस्तारीकरणाचे भवितव्य ठरणार आहे.  पुणे-लोणावळा या मार्गावर उपनगरीय रेल्वे सुरू करण्याचा मुंबई रेल्वे विकास कॉर्पोरेशनचा प्रस्ताव आहे. भूसंपादन वगळता या प्रकल्पासाठी २ हजार ३०६ कोटी रुपये खर्च अपेक्षित आहे.

या खर्चाचा पन्नास टक्के भार केंद्र सरकार व उर्वरित १ हजार १५३ कोटी रुपयांचा खर्च राज्य सरकार उचलणार आहे. या लोहमार्गाच्या उभारणीसाठी राज्य सरकारच्या वतीने पीएमआरडीए, पुणे महापालिका व पिंपरी-चिंचवड महापालिका खर्च करणार आहे. तसा प्रस्तावही तयार केला आहे. त्यानुसार पीएमआरडीएने ३८० कोटी ४९ लाख रुपये, पुणे महापालिका ३९२ कोटी रुपये व पिंपरी-चिंचवड महापालिकेने ३८० कोटी रुपयांचा खर्च उचलणे अपेक्षित आहे. या उपनगरीय लोहमार्गासाठी ३८० कोटी ४९ लाख रुपयांचा हिस्सा देण्यास पुणे महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाने (पीएमआरडीए) यापूर्वीच मंजुरी दिली. या लोहमार्गावरील स्थानांतर व पुनर्वसनाच्या कामासाठी पीएमआरडीएच्या नियुक्तीचा प्रस्तावही मान्य करण्यात आला आहे. एवढेच नव्हे तर पीएमआरडीएने एक पाऊल पुढे टाकत यंदाच्या अर्थसंकल्पात या प्रकल्पासाठी ९ कोटी रुपयांची तरतूद देखील केली आहे.

पीएमआरडीएने आपल्या वाट्याचा हिस्सा देण्याची तयारी दर्शविल्यामुळे या उपनगरीय रेल्वेच्या मार्गाला गती मिळेल, अशी अपेक्षा होती; परंतु पुणे महापालिका व पिंपरी-चिंचवड महापालिकेने त्यांच्या वाट्याचा हिस्सा देण्यास नकार दिला आहे.  त्यामुळे हे काम अद्यापही पुढे सरकलेले नाही. पुणे आणि पिंपरी-चिंचवड या दोन्ही महापालिकांत सत्तांतर झाले आहे. नवे कारभारी तरी याकडे लक्ष देऊन त्या प्रकल्पासाठीच्या खर्चास मान्यता देणार का, यावर या मार्गाचे भवितव्य अवलंबून आहे.

पुणे-लोणावळादरम्यान तिसरा लोहमार्ग उभारण्यासाठी पीएमआरडीए, पुणे महापालिका यांनी त्यांच्या वाट्याला येणारा खर्चाचा वाटा उचलल्यास पिंपरी-चिंचवड महापालिकादेखील आवश्‍यक खर्चाचा वाटा उचलेल. तसा प्रस्ताव महापालिका सर्वसाधारण सभेत संमत करेल. 
- नितीन काळजे,  महापौर, पिंपरी-चिंचवड महापालिका 

तिसरा लोहमार्ग टाकण्यासाठी येणाऱ्या एकूण खर्चातील ३८० कोटी रुपयांचा वाटा पिंपरी-चिंचवड महापालिकेने उचलावा, असा प्रस्ताव यापूर्वी महापालिकेच्या सर्वसाधारण सभेने नाकारला होता. नव्याने हा प्रस्ताव सर्वसाधारण सभेसमोर ठेवावा लागेल. सभेने मंजुरी दिल्यास त्या प्रकल्पासाठी महापालिकेतर्फे निधी दिला जाईल.
- दिनेश वाघमारे,  आयुक्त, पिंपरी-चिंचवड महापालिका

प्रवाशी संख्या वाढण्यास मदत
पुणे-लोणावळा असा सध्या दुहेरी लोहमार्ग आहे. सध्या या मार्गावरून दरारोज ४४ उपनगरीय रेल्वे गाड्यांची वाहतूक होते. तर दरारोज एक लाखाहून अधिक प्रवासी ये-जा करतात. तिसरा आणि चौथा मार्ग अस्तित्वात आल्यानंतर या मार्गावरील गाड्यांची संख्या आणि प्रवासी संख्या आणखी वाढण्यास मदत होणार आहे.

प्रकल्प अद्याप कागदोपत्री
पुणे ते लोणावळा दरम्यान ६४  किलोमीटर लांबीचे रेल्वे रूळ टाकावे लागणार आहेत; तसेच साधारणतः त्यासाठी ५८ हेक्‍टर जमीन संपादित करावी लागणार आहे. यापूर्वीच रेल्वे बोर्डाने यास मान्यता दिली आहे. त्यानंतर २०१३ मध्ये अर्थसंकल्पातही त्यासाठी तरतूद करण्यात आली. या मार्गाचे सर्वेक्षणाचे काम यापूर्वीच पूर्ण केले आहे. गेल्या वर्षी चौथ्या मार्गासही मान्यता देण्यात आली. मान्यता मिळाली असली तरी हा प्रकल्प अद्यापही कागदोपत्रीच राहिला आहे.

Web Title: pune-lonavala issue