पुणे-लोणावळादरम्यान लोहमार्गालगत स्वच्छता

सकाळ वृत्तसेवा
गुरुवार, 3 मे 2018

पिंपरी : पुणे ते लोणावळादरम्यान लोहमार्गावर पाणी साठणारी ठिकाणे शोधून त्यांच्या दुरुस्तीचे काम रेल्वेकडून हाती घेण्यात आले आहे. येत्या महिनाभरात ते पूर्ण करण्यात येणार आहे, असे रेल्वेच्या अधिकाऱ्यांनी "सकाळ'ला सांगितले. 

पिंपरी : पुणे ते लोणावळादरम्यान लोहमार्गावर पाणी साठणारी ठिकाणे शोधून त्यांच्या दुरुस्तीचे काम रेल्वेकडून हाती घेण्यात आले आहे. येत्या महिनाभरात ते पूर्ण करण्यात येणार आहे, असे रेल्वेच्या अधिकाऱ्यांनी "सकाळ'ला सांगितले. 

पुणे ते लोणावळादरम्यान पिंपरी, चिंचवड, आकुर्डी, निगडी, देहूरोड, बेगडेवाडी, तळेगाव, वडगाव, कामशेत, मळवली या ठिकाणी लोहमार्गालगत पाणी साठते. कामशेत परिसरात इंद्रायणी नदीच्या किनाऱ्यालगतच लोहमार्ग आहे. नदीला पूर आली की, पाणी लोहमार्गावर येते. त्यामुळे एक्‍स्प्रेस, मेल, मालगाड्यांबरोबरच लोकलसेवाही विस्कळित होते. गाड्यांना विलंब होतो. हे टाळण्यासाठी प्रशासनाने या लोहमार्गाचे सर्वेक्षण करून पाणी साठणारी ठिकाणे शोधून काढली असून, त्यांच्या दुरुस्तीचे काम तत्काळ हाती घेतले आहे. 

चिंचवड ते निगडीदरम्यान काही भागांत कायम पाणी साठते. त्या ठिकाणी पाण्याचा निचरा होण्यासाठी लोहमार्गालगतची जागा खोदण्यात येत आहे. पुणे ते लोणावळादरम्यानच्या लोहमार्गालगतचा परिसर पावसाळ्यापूर्वी स्वच्छ करण्यात येणार आहे. या ठिकाणी असलेली गटारे साफ करण्यात येणार आहेत. त्यानंतर पावसाळ्यात या ठिकाणी पाणी तुंबणार नाही, असेही या अधिकाऱ्याने स्पष्ट केले. 

पावसाळ्यात लोहमार्गालगत पाणी साठते. त्याचा थेट परिणाम रेल्वेसेवेवर होतो. हे टाळण्यासाठी प्रशासनातर्फे उपाययोजना करण्यात येत आहेत. येत्या काही दिवसांत हे काम पूर्ण होईल. 
- कृष्णाथ पाटील, वरिष्ठ प्रबंधक, वाणिज्य विभाग, मध्य रेल्वे, पुणे

Web Title: pune lonavala local route maintenance will be completed before monsoon