Mahavikas Aghadi March : टेंडर राज आणि प्रशासनाच्या कारभाराविरोधात महाविकास आघाडीचा पुणे महापालिकेवर मोर्चा pune mahavikas aghadi march on pune municipal corporation tenders and administrative work | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Mahavikas Aghadi

Mahavikas Aghadi March : टेंडर राज आणि प्रशासनाच्या कारभाराविरोधात महाविकास आघाडीचा पुणे महापालिकेवर मोर्चा

पुणे - महाविकास आघाडीची पुण्यात होणारी वज्रमूठ सभा रद्द झाली आहे. मात्र, आता शिंदे फडणवीस सरकारला घेरण्यासाठी काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस आणि शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे या तिन्ही पक्षांनी रणनीती आणखी आहे. महापालिकेतील टेंडर राज आणि प्रशासनाच्या कारभाराविरोधात १६ जून रोजी महापालिकेवर मोर्चा काढला जाणार आहे. यामध्ये काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले, विधानसभेतील विरोधी पक्ष नेते अजित पवार आणि ठाकरे गटाचे नेते आदित्य ठाकरे सहभागी होणार आहेत.

महाविकास आघाडीतर्फे घेण्यात आलेल्या पत्रकार परिषदेत ही माहिती देण्यात आली. यावेळी काँग्रेसचे शहराध्यक्ष अरविंद शिंदे, राष्ट्रवादीचे शहराध्यक्ष प्रशांत जगताप, शिवसेनेच्या उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे शहरप्रमुख संजय मोरे, गजानन थरकुडे, माजी आमदार मोहन जोशी आदी यावेळी उपस्थित होते.

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे राज्यात बसून पुणे महापालिकेतील टेंडर राज व विशिष्ट ठेकेदार चालवीत असलेली पुणे महापालिका आणि प्रशासन यांच्या कारभारा विरोधात काँग्रेस ,राष्ट्रवादी आणि शिवसेनेच्या ठाकरे गट या महाविकास आघाडीच्या वतीने १६ जून रोजी मोर्चा आयोजित केला आहे, असे अरविंद शिंदे यांनी सांगितले.

काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी नुकतीच काँग्रेस भवन येथे महाविकास आघाडीची बैठक घेतली. यावेळी काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस व शिवसेनेचे सर्व आजी माजी आमदार, आजी माजी नगरसेवक आदी उपस्थित होते.

महापालिकेतील ठेकेदार व प्रशासन यांचा भ्रष्टाचार वाढला असून, यावर राज्य सरकारचे नियंत्रण नाही. ठरावीक लोकांसाठीच निविदा प्रक्रिया राबविली जात आहे. त्यामुळे या भ्रष्टाचाराविरुद्ध मोर्चा काढण्याचा निर्णय घेण्यात आला.

१६ जून रोजी लाल महाल मार्चला ११.३० वाजता या मोर्चाला सुरवात होणार असून, महापालिकेच्या समोर मोर्चा संपेल.यानंतर महापालिकेसमोरच होणाऱ्या सभेत तिन्ही पक्षाचे नेते मार्गदर्शन करणार आहेत.