वडिलांच्या अंत्यविधीची तयारी करत असतानाच मुलानेही सोडला प्राण

डी. के. वळसे पाटील
सोमवार, 2 एप्रिल 2018

मंचर (पुणे) : शेतकरी कुटुंबातील मुलगा व वडिलांचे प्रेम सर्वश्रूत होते. वडिलांचे वृद्धापकाळाने निधन झाल्याची माहिती समजल्यानंतर मुलगा डोंबिवलीहून गावी आला. वडिलांच्या अंत्यविधीची तयारी सुरु असतानाच मानसिक धक्का बसल्याने मुलानेही प्राण सोडल्याची घटना लोणी (ता. आंबेगाव) येथे घडली. रामचंद्र मारुती वाळूंज (वय ९२) व मुलगा राघू रामचंद्र वाळूंज (वय ६६) यांच्यावर एकाचवेळी अंत्यसंस्कार करण्याच्या दुर्देवी प्रसंगाला नातेवाईकांना सामोरे जावे लागले.

लोणी-वाफगाव रस्त्यावर बागवस्तीमध्ये वाळूंज कुटुंब वास्तव्याला आहे. रामचंद्र वाळूंज हे शेतकरी असून त्यांचे एकत्रित कुटुंब आहे. राघू, प्रभाकर व पोपट या तीन मुलांचे शिक्षण त्यांनी केले. शेतीवर सर्वांचा उदरनिर्वाह होणार नाही म्हणून राघूला त्यांनी मुंबई येथे गोदी मध्ये नोकरीला लावले होते. प्रभाकरला पुणे येथे व पोपट यांना शिक्रापूर येथे कंपनीत नोकरीला लावले. राघू हे सेवानिवृत्त झाले होते. महिन्यातून किमान दोन ते तीन वेळा रामचंद्र यांची सर्व मुले व नातवंडे गावी भेटीसाठी येत होती. त्यांच्यामध्ये हास्य विनोद व जुन्या प्रसंगाच्या गप्पा रंगत होत्या. जुन्या पद्धतीचे लग्न समारंभ, बैलगाडीतील प्रवास आदी विषय नातवंडे एकाग्रतेने ऐकत होते. कुटुंबातील सर्व सदस्यांचे एकमेकाविषयी असलेले प्रेम कौतुकास्पद होते.

रामचंद्र यांना अनेकदा आजारी पडल्यानंतर दवाखान्यातून बरे करून आणले होते. त्यांना अजून आयुष्य मिळावे. त्यांचा सहवास मिळावा. अशी सर्व वाळूंज कुटुंबातील सदस्यांची इच्छा होती. त्यामुळे रामचंद्र यांची सर्वजन काळजी घेत होते. त्यांचे निधन झाल्याची माहिती झाल्याचे समजल्यानंतर सर्व कुटुंबाचे दुखः अनावर झाले. त्यांचा थोरला मुलगा राघू वाळूंज डोंबिवलीहून गावी आला. वडील रामचंद्र यांचा पार्थिव देह पाहिल्यानंतर राघू यांना आलेला हुंदका पाहून उपस्थितांची मने हेलावली. त्यानंतर अंत्यविधीची तयारी सुरु केली. राघू यांना अत्यवस्थ वाटू लागले. राघू यांचा मुलगा बाबाजी वाळूंज, संतोष वाळूंज, महात्मा गांधी तंटामुक्त समितीचे अध्यक्ष संतोष पडवळ, माजी सरपंच दिलीप वाळूंज, पोलीस पाटील ज्ञानेश्वर आढाव पाटील यांनी राघू यांना लोणी येथे देशमुख हॉस्पिटल मध्ये उपचारासाठी दाखल केले. त्यावेळी डॉ. चंद्रकांत देशमुख यांनी तपासणी केली असता. राघू वाळूंज यांची प्राणज्योत मालवल्याचे सांगितले. हि घटना कळल्यानंतर वाळूंज कुटुंबातील सदस्य, नातेवाईक व गावकऱ्यांवर दुखाचा डोंगर कोसळला. शोकाकुल वातावरणात वडील व मुलावर अंत्यसंस्कार करण्यात आले. लोणी गावातील यात्रा समिती धार्मिक व सामाजिक कार्यात राघू यांचा सक्रीय सहभाग होता. कुटुंबातील असलेल्या एकोप्याची गावात चर्चा सुरु आहे.

Web Title: pune manchar father ramchandra walunj and son raghu walunj passes away