
Pune News : माजी गृहमंत्री वळसे पाटील यांनी विधिमंडळात प्रश्न उपस्थित केल्यानंतर मंचर उपजिल्हा रुग्णालयाचा वीज पुरवठा सुरु
Pune News : येथील उपजिल्हा रुग्णालयाचा वीज पुरवठा मंगळवारी (ता.२१) दुपारी बारा वाजून ५० मिनिटांनी खंडित करण्यात आला.येथे नवजात बालके व अतिदक्षता विभागात रुग्ण असलेल्या नातेवाईकांनी व महाविकास आघाडीच्या कार्यकर्त्यांनी वीजपुरवठा पूर्ववत सुरु होण्यासाठी रुग्णालयाच्या आवारात आंदोलन केले.
या आंदोलनाचे पडसाद विधिमंडळात उमटले. राज्याचे माजी गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यांनी विधानसभेत प्रश्न उपस्थित केला. दीड तासानंतर रुग्णालयाचा वीज पुरवठा पूर्ववत सुरु झाला.
मंचर उपजिल्हा रुग्णालयात अतिदक्षता बालक विभाग नऊ बालके, प्रौढ अतिदक्षता विभाग तीन,डायलेसीस सात रुग्ण , प्रसूती कक्षात ३ महिला होत्या. वीज पुरवठा खंडित करू नका.
अशी विनंती वैद्यकीय अधिकारी डॉ.संजय भवारी यांनी केली, पण महावितरणच्या अधिकाऱ्यांनी मागणीकडे दुर्लक्ष करून वीजपुरवठा खंडित केला.या प्रकारामुळे रुग्णालयात हाहाकार उडाला. डॉक्टर, परिचारिका यांची धावपळ सुरु झाली. ही बातमी वाऱ्यासारखी पसरली.
उद्धव ठाकरे शिवसेनेचे जिल्हा संघटक अँड.अविनाश रहाणे, राष्ट्रवादी कॉंग्रेसचे नेते संतोष गावडे ,सुरेश निघोट, आंबेगाव तालुका कॉंग्रेस पक्षाचे अध्यक्ष राजू इनामदार,नीलकंठ काळे, सुरेखा निघोट, कमरअली मनियार, सुवर्णा डोंगरे,विठ्ठल तांबडे आदी महाविकास आघाडीचे कार्यकर्ते व रुग्णांच्या नातेवाईकांनी वीजपुरवठा पूर्ववत सुरु होण्यासाठी आंदोलन सुरु केले.
आंदोलक आक्रमक झाले होते. घटनास्थळी मंचर पोलीस ठाण्याचे पोलीस उपनिरीक्षक शेखर शेटे, तान्हाजी हगवणे, विलास साबळे, राजेश नलावडे, मोनिका राक्षे आले. त्यांनी परस्थितीचे गांभीर्य ओळखून महावितरणचे अधिकारी जयंत गेटमे यांना घटनास्थळी घेऊन आले. रुग्णालयाचे प्रशासन ,आंदोलक यांच्यामध्ये चर्चा घडवून आणली. त्यानंतर वीजपुरवठा सुरु झाला.
“रुग्णालयाची दोन वीज बिलांची एकूण थकीत रक्कम ५२ लाख रुपये आहे. महावितरणने रुग्णालयाला अनेकदा नोटीस दिली होती.पण त्या नोटीसचे उत्तर आले नाही. सध्या थकबाकी वसुलीची धडक मोहीम सुरु आहे.
तात्पुरता वीजपुरवठा (टोकन डिस्कनेक्शन) खंडित केला होता. माजी गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यांनी वीजपुरवठा सुरु करण्याबाबत सूचित केले होते.रुग्णालयाने ३१ मार्चपूर्वी थकीत वीजबिल भरण्याबाबत हमी दिली त्यामुळे वीजपुरवठा पूर्ववत सुरु केला आहे.”
जयंत गेटमे, सहाय्यक अभियंता महावितरण कंपनी मंचर (ता.आंबेगाव)
मंचर (ता.आंबेगाव) येथील उपजिल्हा रुग्णालयात १०० पेक्षा अधिक असून त्यातील काही रुग्ण व बालके अतिविभागात आहेत. काही जणांवर डायलेलीस उपचार सुरु आहे. येथे एक तासापूर्वी महावितरणच्या अधिकाऱ्यांनी वीजपुरवठा खंडित केला आहे. लोक रस्त्यावर आले आहेत. वीजपुरवठा तत्काळ जोडणार का?,
ज्या अधिकाऱ्यांनी वीज पुरवठा खंडित करण्याचे आदेश दिले त्यांना निलंबित करणार का ?असा प्रश्न वळसे पाटील यांनी विधिमंडळात उपस्थित केला होता. उपमुख्यमंत्री तथा उर्जामंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले “वीजपुरवठा खंडित केल्याबाबतची लगेच माहिती घेण्यात येईल.
वीजपुरवठा तत्काळ सुरु केला जाईल. कोणी जर जाणीवपूर्वक चूक केली असेल तर त्या अधिकाऱ्यांवर कारवाई केली जाईल.”