#PuneMandai वितरणाअभावी कोट्यवधींचा खर्च ‘गाळ्या’त

सकाळ वृत्तसेवा
बुधवार, 20 जून 2018

पुणे - पथारीवाल्यांना गाळ्यांचे वितरण न केल्याने मागील आठ वर्षांपासून शहरातील पाच भाजी मंडया बंद अवस्थेत आहेत. सनसिटी भागातील एक, वडगाव शेरी भागातील दोन, बाणेर भागातील एक आणि नवश्‍या मारुती गणपतीजवळील एक अशा पाच मंडया बंद आहेत. यातील नवश्‍या मारुती येथील मंडईत महापालिकेने स्मार्टसिटीचे कार्यालय उघडून मूळ उद्देशालाच हरताळ फसला आहे.

जवाहरलाल नेहरू राष्ट्रीय शहरी पुनर्निर्माण मोहिमेअंतर्गत (जेएनएनयूआरएम) २००७ मध्ये महापालिकेला शहरात मंडया उभारण्यासाठी सुमारे २७ कोटी रुपयांचा निधी मिळाला. यातून पथारीवाल्यांसाठी महापालिकेने पाच ठिकाणी मंडया बांधल्या. मात्र, मागील आठ वर्षांपासून बंद असलेल्या या मंडयांमुळे एवढा निधी मिळूनही पथारीवाल्यांचे प्रश्न सुटलेले नाहीत. त्यातच पथारीवाल्यांच्या संख्येत दिवसेंदिवस भर पडत असल्यामुळे याही मंडया भविष्यात सर्व पथारीवाल्यांना सामावून घेण्यात अपुऱ्या ठरणार आहेत. त्यामुळे रस्त्यावर बसण्याशिवाय पथारीवाल्यांना पर्याय नसल्याचे दिसत आहे. या मंडयातील गाळेवाटपाचे धोरण पालिकेकडे नसल्याचे समोर आले आहे.

महात्मा फुले मंडईवरील ताण कमी करण्यासाठी शहरात वेगवेगळ्या ठिकाणी पाच मंडया उभारण्यात आल्या आहेत. मात्र, त्यातील गाळ्यांचे फेरीवाल्यांना अद्यापपर्यंत वाटप करण्यात आले नाही. 
- संजय शंके, जाणीव संघटना

महापालिकेने वर्षापूर्वी गाळे देणार असे सांगून आम्हाला येथे स्थलांतरित केले. तेव्हापासून गाळे मिळत नसल्याने आम्हाला येथे बाहेर बसूनच भाजीपाला विकावा लागत आहे. पालिकेने लवकर गाळे द्यावेत.
- माया जाधव, भाजी विक्रेत्या 

आम्ही १५ वर्षांहून अधिक काळ येथे व्यवसाय करत आहोत. एकूण ४० लोकांचे स्थलांतर केले असताना वीस लोकांनाच ओळखपत्र देण्यात आले. बाकीच्यांना ओळखपत्र मिळणे बाकी आहे. 
- गुरू गोंधळी, भाजी विक्रेते 

Web Title: pune mandai shop distribution expenditure