पुणे-मनमाड नॉनस्टॉप; बुधवारपासून मालवाहतूक सुरू

पुणे-मनमाड नॉनस्टॉप; बुधवारपासून मालवाहतूक सुरू

पुणे- पुणे-मनमाड मार्गावरील रेल्वेगाड्यांसाठी दौंडमध्ये तयार करण्यात येत असलेल्या बाह्यवळण मार्गाचे (कॉड लाइन) काम पूर्ण झाले आहे. रविवारी (ता. १५) या मार्गावर चाचणी घेतली जाणार असून, येत्या बुधवारी (ता. १८) बाह्यवळणावरून रेल्वे वाहतूक सुरू होणार आहे. या बाह्यवळणामुळे गाड्यांचा अर्धा ते पाऊण तासाचा वेळ वाचेल. मात्र, सध्या या मार्गावरून फक्त मालवाहतूक होणार आहे.

पुणे-मनमाड लोहमार्गावरील सर्व रेल्वेगाड्यांना दौंड स्थानकावर सध्या अर्धा ते एक तासापर्यंत थांबावे लागत आहे. प्रवाशांचा हा वेळ आणि दौड जंक्‍शनवरील ताण कमी करण्यासाठी रेल्वे प्रशासनाने २०१६ मध्ये ३० कोटी रुपये खर्च करून दौंडला जाणे टाळण्यासाठी बाह्यवळण मार्ग करण्याचा निर्णय घेतला होता. त्यानुसार भूसंपादन करून दौंड जंक्‍शनच्या पाठीमागे सुमारे १ हजार १०० मीटरचे बाह्यवळणाचे काम हाती घेण्यात आले. नियोजित वेळेपेक्षा जास्त वेळ लागल्यानंतर आता रविवारी या मार्गावर गाडीची चाचणी घेतली जाईल. बुधवारपासून (ता.१८) पुणे-मनमाड-पुणेदरम्यान धावणाऱ्या मालगाड्या या बाह्यवळणावरून सोडण्यात येणार आहेत.

भूसंपादनासाठी राज्य सरकारकडे रेल्वे प्रशासनाने २०१६ मध्ये सुमारे १२ कोटी ५० लाख रुपयेही जमा केले होते.  मात्र, भूसंपादनास उशीर लागल्याने हे काम आठ महिन्यांपेक्षा जास्त काळ विलंबाने पूर्ण झाले. त्यातही बाह्यवळणावरील प्लॅटफॉर्मचे काम अद्याप पूर्ण झालेले नाही. 

प्रवासी गाड्यांसाठी प्रतीक्षाच 
दौंड येथील रेल्वेच्या बाह्यवळण मार्गाचे काम पूर्ण झाले असून, तो मालवाहू गाड्यांसाठी सुरू करण्यात येणार आहे. मार्गावर प्लॅटफॉर्म उभारून प्रवासी थांबा देण्यात येणार आहे; परंतु या प्लॅटफॉर्मचे काम भूसंपादनास झालेल्या विलंबामुळे पूर्ण होऊ शकले नाही. भूसंपादनाची प्रक्रिया पूर्ण करून येत्या चार महिन्यांत या प्लॅटफॉर्मचे काम पूर्ण करण्यात येईल, असे रेल्वे प्रशासनाकडून सांगण्यात आले. 

बाह्यवळण मार्ग 
खर्च - ३० कोटी  
लांबी - १,१०० मीटर 
प्लॅटफॉर्मची लांबी - ६०० मीटर  
वाचणारा वेळ - २४ गाड्यांचा सुमारे १ तास 

बाह्यवळणामुळे प्रवासी आणि मालवाहू गाड्यांचा बराच वेळ वाचणार आहे. तसेच, दौंड जंक्‍शनवरील ताणही काही प्रमाणात कमी होणार आहे.
- मिलिंद देऊस्कर, विभागीय व्यवस्थापक, मध्य रेल्वे

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com