गणेशमूर्ती विकल्याबद्दलच्या अफवा : अंनिस नोंदवणार गुन्हा

सकाळ वृत्तसेवा
मंगळवार, 12 सप्टेंबर 2017

डॉ. नरेंद्र दाभोलकर, गोविंद पानसरे व प्रा.कलबुर्गी यांचे मारेकरी आणि त्यामागील सूत्रधार अद्याप फरार आहेत. त्यामुळे या शक्तीचा जोर वाढला आहे. या तिघांच्या खुनाचे आणि ज्येष्ठ पत्रकार गौरी लंकेश यांच्या खुनामाध्ये साधर्म्य दिसून येते. ही बाब तपास यंत्रणांनी लक्षात घेऊन सखोल चौकशी करावी. विवेकवादी कार्यकर्ते आणि पत्रकार संघटनांच्या या लढाईत नागरिकांनीही सहभागी व्हावे, असे आवाहनही देशमुख यांनी केले.

पुणे : "नागरिकांनी दान केलेल्या गणेशमूर्ती अंधश्रद्धा निर्मूलन समितीच्या कार्यकर्त्यांनी विकल्या. मूर्तीची विक्री करणाऱ्या कार्यकर्त्यांना मारहाण करण्यात आली. अशा स्वरूपाची खोटी माहिती व्हॉटस्‌अप, फेसबुकवर पसरवून अंनिसची बदनामी केली जात आहे. त्यासंदर्भात सायबर गुन्हेगारी कायद्यांतर्गत आम्ही गुन्हा नोंदविणार आहोत,'' अशी भूमिका महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे राज्य सरचिटणीस सचिव मिलिंद देशमुख यांनी घेतली.

गणपती विसर्जन मिरवणुकीविषयी बदनामीकारक मजकूर पसरवून अंनिसला लक्ष्य केले जात आहे. यासंदर्भात अंनिसने पत्रकार परिषदेत आपली भूमिका स्पष्ट केली. राज्य सरचिटणीस ठकसेन गोराणे, जिल्हाध्यक्ष नंदिनी जाधव, कार्याध्यक्ष श्रीपाल ललवाणी उपस्थित होते.

देशमुख म्हणाले, "अंनिस वीस वर्षापासून पर्यावरणपूरक गणेशोत्सव उपक्रम राबविते. शहरातील मानाच्या गणेशोत्सव मंडळांसह राज्य सरकार व समाजाकडून त्याचा चांगला प्रतिसाद मिळाला आहे. म्हणूनच महाराष्ट्र अनिसला बदनाम करण्याच्या हेतूने संबंधित माहिती प्रसारित केली जात आहे. व्हाटस्‌अप, फेसबुकवर म्हटल्याप्रमाणे मुंढवा पोलिस ठाण्यामध्ये असा कोणताही गुन्हा दाखल झालेला नाही. पोलिस अधिकाऱ्याचे नाव खोटे आहे. अशा खोट्या बातम्या पसरविणे कायद्याने गुन्हा असून आम्ही संबंधित माहिती पोस्ट करणाऱ्याचा शोध घेतला आहे. त्याच्यावर पोलिस ठाण्यात तक्रार दाखल करण्यात येणार आहे.''

पर्यावरणपुरक गणेशोत्सवात सहभागी न होण्यासंदर्भात पुणे विद्यापीठातील महाविद्यालयांना परिपत्रक काढणाऱ्या अधिकाऱ्याला शिक्षणमंत्री विनोद तावडे यांनी कारणे दाखवा नोटीस बजावून योग्य पाऊल उचलले आहे. अभिनेता भाऊ कदम याने गणपती बसविल्यासंदर्भात त्याच्यावर बहिष्कार टाकण्याचा प्रकार घटनाविरोधी आहे. हिंदू, ख्रिश्‍चन, मुस्लिम धर्मीयांमध्ये बहिष्काराचे प्रकार घडत आहे. एखाद्याला बहिष्कृत करण्याचा प्रयत्न करणाऱ्यांविरुद्ध गुन्हा दाखल होऊ शकतो, असेही देशमुख यांनी सांगितले.
 

Web Title: pune marathi news anis registers complaints ganesh idols sale rumours